भारताला मिळालं पण पाकिस्तानच्या मागणीकडे पुतीन यांनी ढुंकूनही पाहिलं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:31 PM2022-06-02T16:31:30+5:302022-06-02T16:32:29+5:30

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. यातच रशिया-युक्रेन युद्धानं पाकिस्तानसाठी आणखी संकटं निर्माण झाली आहेत. पाकिस्तानात गहूचा तुटवडा निर्माण झाला आहे.

pakistani fm miftah ismail said it is difficult to buy russian oil and wheat | भारताला मिळालं पण पाकिस्तानच्या मागणीकडे पुतीन यांनी ढुंकूनही पाहिलं नाही!

भारताला मिळालं पण पाकिस्तानच्या मागणीकडे पुतीन यांनी ढुंकूनही पाहिलं नाही!

Next

नवी दिल्ली-

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. यातच रशिया-युक्रेन युद्धानं पाकिस्तानसाठी आणखी संकटं निर्माण झाली आहेत. पाकिस्तानात गहूचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादल्यामुळे पाकिस्तानला इच्छा असूनही रशियाकडून तेल आणि गहू आयात करता येत नाहीय. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे आम्हाला रशियाकडून इंधन आणि गहू आयात करणं आता मुश्किल झालं आहे, असं पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माइल यांनी मंगळवारी म्हटलं. रशियाकडून गहू आयात करण्यासाठी पाकिस्ताननं युद्धाच्या आधीच मागणी केली होती. पण त्यावर अजूनही रशियाकडून उत्तर आलेलं नाही, असंही ते म्हणाले. 

"रशियानं इंधन खरेदीसाठीचा कोणताही प्रस्ताव पाकिस्तानला दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला रशियाकडून इंधन खरेदीचा विचार करणं देखील आता कठिण होऊन बसलं आहे", असं सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे अर्थमंत्री मिफ्ताह म्हणाले. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारनं रशियन सरकारकडे गहू खरेदीची मागणी केली होती. पाकिस्तानच्या नव्या सरकारनंही रशिया आणि युक्रेन अशा दोन्ही देशांकडे गहू आयातीची मागणी केली आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दोन्ही देशांनी दिलेली नाही. 

स्वस्तात इंधन मिळण्याची पाकिस्तानला आशा
रशियानं जर स्वस्तात इंधन खरेदीची संधी उपलब्ध करुन दिली तर पाकिस्तान नक्कीच यावर विचार करेल, असं मिफ्ताह म्हणाले. पण रशियानं आताच्या घडीला स्वस्तात इंधन देण्याची तयारी जरी दर्शवली तरी पाकिस्तानच्या बँकेची सद्यस्थिती व्यवस्थित नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रशियानं पाकिस्तानला गहू आणि इंधन खरेदीत ३० टक्के सूट देण्याची ऑफर दिली असल्याच्या इम्रान खान यांचा दावा देखील मिफ्ताह यांनी फेटाळून लावला. 

"मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की इम्रान खान यांना रशिया देत असलेल्या सवलतीबाबत कुणी सांगितलं हे मला माहित नाही. सत्ता गमवल्यानंतरच ते अशाप्रकारचं विधान करू लागले आहेत. हे तेच व्यक्ती आहेत की जे सुरुवातीला अमेरिकेच्या षडयंत्रामुळे आमचं सरकार सत्तेत आल्याचा आरोप करत होतं आणि आता ते नवा दावा करू लागले आहेत. जर त्यावेळी रशिया पाकिस्तानला स्वस्तात गहू आणि इंधन देत होता मग तेव्हा का खरेदी केलं नाही?", असा सवाल मिफ्ताह यांनी उपस्थित केला. इंधन किंवा खाद्य तेल नाही, मग कमीत कमी गहू तरी आयात करुन द्यावा यासाठी पाकिस्तान सरकार रशियाशी चर्चा करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

आर्थिक दिवाळखोरीला निघालेल्या पाकिस्ताननं आता आयएमएफकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत आयएमएफसोबत सातत्यानं चर्चा सुरू असल्याचंही अर्थमंत्री मिफ्ताह म्हणाले. 

Web Title: pakistani fm miftah ismail said it is difficult to buy russian oil and wheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.