सोन्याचे शूज अन् सोन्याचा टाय... 'या' नवरदेवाचा नाद करायचा नाय!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 12:31 PM2018-04-16T12:31:48+5:302018-04-16T12:31:48+5:30
नवरदेवाचा थाटच न्यारा
पाकिस्तान: लग्न जरी दोन मनांचं मिलन असलं तरी अनेकदा हे मिलन बरंच खर्चिक असतं. लग्न मंडप, जेवण, साड्या, मानपान या सर्व खर्चामुळेच 'लग्न पाहावं करुन', असं म्हटलं जातं. याशिवाय सोन्याचे दर पाहता फक्त दागिन्यांचा खर्चच काही लाखांच्या घरात जातो. मुलीला माहेरहून किती दागिने मिळाले, सासरच्यांनी किती दागिने केले, याबद्दलच्या चर्चा तर कित्येक दिवस रंगतात. मात्र पाकिस्तानमधल्या एका लग्नानंतर चर्चा होतेय ती नवऱ्या मुलाच्या अंगावरील दागिन्यांची.
पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या एका झालेल्या लग्नात नवऱ्या मुलानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. कारण त्यानं चक्क 25 लाखांचं सोनं अंगावर घातलं होतं. लाहोरमध्ये झालेल्या स्वागत समारंभात हा सोन्याचा नवरदेव पाहायला मिळाला. त्यानं घातलेल्या सूटची किंमत 63 हजार रुपये इतकी होती. याशिवाय त्याच्या सूटवरील खड्यांची किंमत 16 हजार रुपये होती. ही सोनेरी यादी इथेच संपत नाही. गोल्डन सूटला सूट करणारा नवरदेवाचा गोल्डन टाय तब्बल 10 तोळ्यांचा होता. पाकिस्तानी चलनात त्याची किंमत साधारणत: 5 लाख रुपये इतकी होते.
This groom in Lahore wore an outfit on his valima which is worth Rs. 25 lakhs. His suit alone cost, Rs. 63,000, his shoes were made with 32 tolas of gold and they cost Rs. 17 lakhs and that tie is made with 10 tolas gold which cost Rs. 5 lakhs. pic.twitter.com/vaGJUeHJ0b
— Zaydan Khan (@Zaydan_Khan) April 13, 2018
याशिवाय या नवऱ्या मुलाचे बूटदेखील सोन्याचे होते. अनेकांना ते सुरुवातीला फक्त सोनेरी बूट आहेत, असं वाटलं. मात्र काही वेळानं ते बूट सोन्याचे आहेत, हे उपस्थितांच्या लक्षात आलं. हे बूट तब्बल 32 तोळ्यांचे होते. याची किंमत पाकिस्तानी रुपयात तब्बल 17 लाख रुपये इतके आहे. या गोल्डप्रेमी नवरदेवाचं नाव हाफिज सलमान शाहीद असं आहे. हा नवरदेव मोठा व्यावसायिक आहे. सध्या त्याच्या लग्नाच्या स्वागत समारंभाची चर्चा सुरू आहे.