पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला, टाकली भारतविरोधी पोस्ट
By admin | Published: May 10, 2017 12:26 PM2017-05-10T12:26:03+5:302017-05-10T12:36:47+5:30
गेल्या महिन्यात देशातील आघाडीच्या 10 शिक्षणसंस्थांच्या संकेतस्थळांवर पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला होता
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 : गेल्या महिन्यात देशातील आघाडीच्या 10 शिक्षणसंस्थांच्या संकेतस्थळांवर पाकिस्तानी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला होता. आज पुन्हा पाकिस्तानी हॅकर्सनी ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे संकेतस्थळ हॅक केले आहे. संकेतस्थळ हॅक करत त्यावर कुलभूषण जाधव आणि भारतविरोधी पोस्ट टाकण्यात आली आहे. काही वेळानंतर संकेतस्थळ पुन्हा सुरु झाले.
पाक हॅकर्सने संकेतस्थळावर कुलभूषण जाधव यांचा फोटो आणि त्यासोबत फाशीचा फंदा टाकला आहे. तुम्हाला कुलभूषण जाधव हवे आहेत का ? तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात का ? आम्ही तुम्हाला त्यांचा मृतदेह पाठवून देऊ, असा संदेश हॅकर्सनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. तुम्हाला स्नॅपडिल आणि स्नॅपचॅटमधील फरक समजत नाही आणि तुम्ही कुलभूषण जाधव यांच्या सुटकेची मागणी करत आहात. असा मेसेज हॅकर्ससने संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
गेल्या महिन्यात दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली , आयआयटी-बीएचयू , कोटा विद्यापीठ, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अँड टेक्नॉलॉजी, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट आणि नॅशनल एरोस्पेस लॅब्रोटोरीज अँड बोर्ड ऑफ रिसर्च इन न्युक्लिअर सायन्सेस यांच्या वेबसाईट पाक हॅकर्सनी हॅक केल्या होत्या. या शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर पाकिस्तान जिंदाबाद ही घोषणा टाकण्यात आली होती.
All India Football Federation website was hacked, hackers posted messages against #KulbhushanJadhav and India. Website now restored pic.twitter.com/prL7E6uaSS
— ANI (@ANI_news) May 10, 2017
दरम्यान, हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेला नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (इंटरनॅशनल कोर्ट आॅफ जस्टीस) काल स्थगिती दिली आहे. भारताच्या मुसद्दीगिरीचा हा मोठा विजय असून आता कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याचे मानले जात आहे. ह्यइंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसह्णने यासंदर्भात एक पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही पाठविले आहे. विशेष म्हणजे भारताने यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे दार ठोठावले होते.