शाहिद खकान अब्बासी बनले पाकिस्तानचे 18वे पंतप्रधान 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 06:21 PM2017-08-01T18:21:05+5:302017-08-01T18:30:24+5:30

नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील वजनदार नेते शाहिद खकान अब्बासी हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत.

Pakistani lawmakers elect Shahid Abbasi as PM to replace ousted Nawaz Sharif | शाहिद खकान अब्बासी बनले पाकिस्तानचे 18वे पंतप्रधान 

शाहिद खकान अब्बासी बनले पाकिस्तानचे 18वे पंतप्रधान 

इस्लामाबाद, दि. 1 - नवाज शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील वजनदार नेते शाहिद खकान अब्बासी हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत. शाहिद खकान अब्बासी यांना संसदेत 221 मतं मिळाली असून, ते पंतप्रधानपदी विराजमान झालेत. पाकिस्तानातील सत्ताधारी मुस्लिम लीग(नवाज) या पक्षानं शरीफ पायउतार झाल्यानंतर त्यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली होती. अखेर त्यांनी आज पाकिस्तानच्या संसदेत बहुमत सिद्ध करत अधिकृतरीत्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब केलं आहे.

58 वर्षांचे अब्बासी शरीफ यांचे निष्ठावंत समजले जातात. नवाज यांनी राजीनामा देईपर्यंत ते मंत्रिमंडळात तेल आणि नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री होते. शाहबाज यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायचा व आपल्या बंधूंच्या अपात्रतेने रिक्त लाहोरची जागा लढवायची, असे धोरण पक्षाने ठरविले असल्याचे वृत्त आहे. शरीफ यांचे उत्तराधिकारी म्हणून सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीगने (नवाज) त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ते संसदेचे सदस्य नसल्यानं त्यांना या पदासाठी वाट पाहावी लागणार आहे. पंतप्रधान होण्यासाठी शाहबाज यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहावर (मजलिस-ए-शूरा) निवडून येणे आवश्यक असल्याने ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुमारे दीड महिन्यासाठी शाहिद खकान अब्बासी यांनी हंगामी पंतप्रधानपद सांभाळावे, असेही पक्षाने ठरविले होते. 

नवाज शरीफ हे पनामागेट या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात दोषी असून, ते पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहू शकत नाहीत, असा आदेश येथील सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे नवाज शरीफ यांना नाइलाजाने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नवाज शरीफ यांच्या कुटुंबीयांनाही न्यायालयाने या प्रकरणात दोषी ठरविले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नवाज शरीफ यांनी कुरकुर करीतच राजीनामा दिला होता. न्यायालयाने सांगितले म्हणून आपण राजीनामा देत आहोत, पण आपण काहीही गैर केलेले नाही, असे शरीफ म्हणाल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठेच आव्हान देणे शक्य नसल्याने त्यांनी नाइलाजाने राजीनामा दिला होता.

नवाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा गैरवापर करून आणि मनी लाँड्रिंगद्वारे लंडन व अन्यत्र ज्या मालमत्ता विकत घेतल्या, त्या पनामागेट प्रकरणातून उघडकीस आल्या होत्या. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या मालमत्तांचाही पनामागेटमध्ये उल्लेख होता. शरीफ यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केल्यानंतर इम्रान खान यांच्या तेहरिक-ए- इन्सान या पार्टीतर्फे तसेच अन्य संघटनांतर्फे शरीफ यांच्या पनामागेट प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी याचिका करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमले.

Web Title: Pakistani lawmakers elect Shahid Abbasi as PM to replace ousted Nawaz Sharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.