पाकिस्तानी नेता म्हणतो, लालू यादव इम्रान खानचे राजकीय गुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 07:13 PM2018-08-20T19:13:48+5:302018-08-20T19:18:02+5:30
माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान स्वीकारल्यापासूनच विरोधकांकडून त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
इस्लामाबाद - माजी क्रिकेटपटू आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान स्वीकारल्यापासूनच विरोधकांकडून त्यांना टीकेचे लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये दिलेले भाषण पंतप्रधान पदाला साजेशे नव्हते, अशी टीका पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते सय्यद खुर्शिद शाह यांनी केली आहे. या भाषणावरून भारतातील राजकीय नेते लालूप्रसाद यादव हे इम्रानचे राजकीय गुरू असावेत, असे वाटते, असे शाह म्हणाले.
पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. इम्रान खान यांनी केलेले भाषण ऐकून असे वाटते की,लालूप्रसाद यादव त्यांचे राजकीय गुरू असावेत. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये इम्रान यांचे भाषण सुरू असताना विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावेळी इम्रानचा तोल सुटला होता. क्रिकेटपासून नेता बनलेल्या इम्रानकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती, असेही शाह यांनी सांगितले.
पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांनी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रानचा तहरिक ए इन्साफ पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला होता.