'या' पाकिस्तानी व्यक्तीनं बिल गेट्स यांच्याकडून लाटले तब्बल 743 कोटी रुपये; पुस्तकात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 07:56 PM2021-08-22T19:56:06+5:302021-08-22T19:58:40+5:30
Microsoft Bill Gates: सायमन क्लार्क आणि विल लॉच यांच्या 'द की मॅन: द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ द ग्लोबल एलिट इज डुप्ड बाय कॅपिटलिस्ट फेयरी टेल' या पुस्तकात असा दावा करण्यात आलाय.
नवी दिल्ली: बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. अनेक देशांमध्ये त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे. पण, ते एका पाकिस्तानी व्यक्तीला कधीच विसरू शकणार नाहीत. या पाकिस्तानी व्यक्तीनं त्यांच काही चांगलं केलं नाही, तर त्यांची फसवणूक करुन 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 743 कोटी रुपये लांबवले आहेत.
सायमन क्लार्क आणि विल लॉच यांच्या 'द की मॅन: द ट्रू स्टोरी ऑफ हाऊ द ग्लोबल एलिट इज डुप्ड बाय कॅपिटलिस्ट फेयरी टेल' पुस्तकात असा दावा करण्यात आलाय की, पाकिस्तानच्या आरिफ नकवी नावाच्या एका व्यक्तीनं बिल गेट्स यांच्यासह अनेक श्रीमंतांची फसवणूक केली आहे.
कोण आहे आरिफ नकनी ?
नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकात दावा करण्यात येतोय की, आरिफ नक्वी नावाचा पाकिस्तानी व्यक्ती पाकिस्तानमधून चालणाऱ्या एका खाजगी इक्विटी फर्म 'द अब्राज ग्रुप'चा प्रमुख होता. या फर्मद्वारे तो जगातील मोठ-मोठ्या गुंतवणूकदारांना विविध व्यवसायांमध्ये पैसे गुंतवण्यास मदत करायचा.
श्रीमंतांशी संबंध बनवले
आपल्या प्रभावाच्या बळावर, आरिफ नकवीने बिल गेट्स, बिल क्लिंटन आणि गोल्डमॅन सॅक्सचे माजी सीईओ लॉयड ब्लँकफेन यांच्यासह अनेक अतिश्रीमंत व्यक्तींसोबत चांगले संबंध बनवले होते. या संबंधांचा फायदा घेत त्यानं गुंतवणूक मिळवण्याच्या नावाखाली बिल गेट्सकडून मोठी रक्कम लांबवली.
असा झाला खुलासा
पुस्तकानुसार, नकवीनं त्याला मिळालेल्या 78 कोटी डॉलर्सचा गैरवापर केला. तर 38.5 कोटी डॉलर्सचा त्याच्याकडे कुठलाही हिशोब नाही. आरिफ नकवीला आता या घोटाळ्याप्रकरणी दीर्घ कारावास भोगावा लागू शकतो. दरम्यान, आरिफ न्यूयॉर्कमध्ये असताना 2017 मध्ये त्याच्या एका कर्मचाऱ्यानंच सर्व गुंतवणूकदारांना मेल पाठवून त्याच्या या घोटाळ्याची माहिती दिली. आरिफ नकवीचा खरा चेहरा समोर आल्यावर गुंतवणूकदारांना धक्का बसला. त्यानंतर द अब्राज ग्रुप कोसळला.