पाकिस्तानी आंबे जगासाठी ‘आंबट’च!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 08:46 AM2021-06-22T08:46:47+5:302021-06-22T08:50:01+5:30
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अक्षरश: डबघाईला आली आहे.
पाकिस्तान सध्या अनेक प्रश्नांनी ग्रस्त आहे. अंतर्गत आणि बाह्य प्रश्नांनी त्यांचं कंबरडं मोडलं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात आणि जगात त्याची पत खालावली आहे, तरीही भारताच्या कुरापती काढण्याची त्यांची खोड काही केल्या जिरत नाही ही गोष्ट वेगळी.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अक्षरश: डबघाईला आली आहे. अत्यावश्यक कामांसाठीही त्यांच्याकडे पैसा नाही. कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतोच आहे. सरकारच्याच माहितीनुसार २०१९-२०च्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तब्बल ८७ टक्क्यांपेक्षाही अधिक कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. २०१७-१८मध्ये याच कर्जाचा वाटा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७२ टक्के होता. हे कर्ज वाढतच आहे. अनेक देशांनी पाकिस्तानला पुन्हा कर्ज देण्यास नकार दिला आहे. आधी घेतलेल्या कर्जाच्या केवळ व्याजाची परतफेड करणेही या देशाला सध्या शक्य होत नाही. देशातील बेरोजगारी कळसाला गेली आहे.
लोकांच्या हाताला काम नाही, दारिद्र्य कमी होण्याची कुठलीही चिन्हं नाहीत. दहशतवाद कमी होण्याचं नाव नाही. लोकांमधली असुरक्षितता वाढली आहे. जागरुकतेचा अभाव, अकार्यक्षम शिक्षणप्रणाली, अशिक्षितपणा, अंतर्गत वाद.. एक ना दोन.. अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तान त्रस्त आहे. त्यावर काय उपाय करावा, जगात खालावलेली आपली आर्थिक, राजकीय, सामाजिक, आंतरराष्ट्रीय पत कशी सुधारावी यासाठी हरतऱ्हेने ते प्रयत्न करीत आहेत.
आपली पत सुधारण्यासाठी त्यांनी आता एक नवा प्रयोग सुरू केला आहे. आंब्यांचा. आंबा हा फळांचा राजा. भारत-पाकिस्तातून बऱ्याच देशांत आंबा निर्यात केला जातो. याच आंब्यांचा उपयोग करून इतर देशांशी असलेले आपले संबंध सुधारावेत, जगानं आपल्याशी ‘गोड’ बोलावं, संबंध अगदी मधुर जरी झाले नाहीत, तरी सुधारावेत यासाठी पाकिस्ताननं ‘मँगो डिप्लोमसी’ सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच जगातल्या अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना व महत्त्वाच्या व्यक्तींना पाकिस्तानने आंबे भेट म्हणून पाठविले; पण हाय रे दुर्दैव! आंब्यांची मधुर गोडीही इतर देशांचा पाकिस्तानशी असलेला कडवटपणा दूर करू शकलेली नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची ही खेळीही सपशेल अपयशी ठरली आहे. इतर देशांशी असलेले आपले संबंध सलोख्याचे व्हावेत यासाठी पाकिस्ताननं जगभरातल्या तब्बल ३२ देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आंबे भेट म्हणून पाठवले होते. अर्थातच त्यांचा नवा आणि जानी दोस्त चीनचाही त्यात समावेश होता; पण जगातल्या कोणत्याच देशाला पाकिस्तानची ही ‘मँगो डिप्लोमसी’ आवडली नाही. चीनसहित जवळपास सर्वच देशांनी पाकिस्तानची ही ‘आंबा भेट’ आल्यापावली परत पाठवली आहे! चीन, अमेरिका, कॅनडा, नेपाळ, इजिप्त, श्रीलंका.. इत्यादी सर्वच देशांनी पाकिस्तानचे आंबे जसेच्या तसे परत पाठवले आहेत. पाकिस्तान विदेश मंत्रालयाच्या सूचीत फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचाही समावेश होता, पण त्यांनी तर या आंब्यांची दखलही घेतली नाही. अर्थातच, त्यासाठी ‘काेरोना’चं कारण सर्वांनी पुढे केलं आहे.
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अरीफ अल्वी यांच्या वतीनं विविध देशांना ही आंबा भेट पाठवण्यात आली होती, त्यात ‘चौसा’ या जातीच्या आंब्यांचा समावेश होता. त्याआधी ‘अनवर रत्तोल’ आणि ‘सिंधारी’ या जातीचे आंबे इतर देशांना भेट म्हणून पाठवण्यात आले होते; पण पाकिस्तानच्या आंब्यांची ‘गोडी’ कोणालाच आवडली नाही.
अर्थातच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांसाठी ‘मँगो डिप्लोमसी’ नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही देशांतर्फे विविध देशांना आंबे पाठवले जातात. पाकिस्तानने १९८१ पासून विविध देशांच्या प्रमुखांना आंबे भेट म्हणून पाठवायला सुरुवात केली आहे. एकीकडे पाकिस्ताननं भारताच्या कुरापती काढणं, भारताला मुद्दाम त्रास देणं आजवर कधीही सोडलं नसलं तरी भारतालाही पाकिस्तानी आंबे ते भेट म्हणून पाठवतच होते.
२०१५ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना आंबे भेट म्हणून पाठवले होते. २०१० मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी परराष्ट्र सचिवस्तरावरील चर्चेसाठी आणि सार्क परिषदेसाठी पाकिस्तानला गेलेल्या प्रत्येक भारतीय मुत्सद्याला २० किलो आंबे भेट दिले होते.