तोंड लपविण्यासाठी पाकची मीडिया टूर
By admin | Published: October 3, 2016 04:04 AM2016-10-03T04:04:57+5:302016-10-03T04:04:57+5:30
नियंत्रण रेषेवर ‘भारताने कोणतीही लष्करी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक)’ पाकिस्तानच्या हद्दीत केलेली नाही हे ‘सिद्ध’ करण्यासाठी नेले होते.
नवी दिल्ली : भारताने केलेल्या लष्करी कारवाईमुळे झालेली नाचक्की लपविण्याचा प्रयत्न म्हणून पाकिस्तानच्या लष्कराने शनिवारी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना नियंत्रण रेषेवर ‘भारताने कोणतीही लष्करी कारवाई (सर्जिकल स्ट्राईक)’ पाकिस्तानच्या हद्दीत केलेली नाही हे ‘सिद्ध’ करण्यासाठी नेले होते. हे वृत्त रविवारी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिले.
‘एजन्सी फ्रान्स प्रेसने (एएफपी) पत्रकारांची पाकिस्तानने अशी विमानाने भेट घडवून आणणे हे ‘दुर्मिळ पाऊल’ असल्याचे म्हटले. या लढाईतील आपले म्हणणे आग्रहाने सांगण्यासाठी पाकिस्तानने थेट सीमारेषेवर आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घेऊन जाणे हे दुर्मिळ पाऊल आहे, असे एएफपीने म्हटले आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे कोणतेच चिन्ह सापडलेले नाही व भारताने केलेला दावा धादांत खोटा आहे हे जगापुढे सिद्ध झाले आहे, असे लेफ्टनंट जनरल व पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिम बाज्वा यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितल्याचे वृत्त ‘डॉन’ आणि ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने दिले.
लष्कराने २० वृत्तसंस्थांच्या ४० पत्रकारांना नियंत्रण रेषेवरील फॉरवर्ड कमांड पोस्टवर विमानाने नेले होते. असे कोणतेही सर्जिकल स्ट्राईक भारताकडून २८ व २९ सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेले नाही, असे पाकिस्तानने म्हटले व सीमेपलीकडून नेहमीच होणाऱ्या गोळीबारात आमचे दोन सैनिक ठार झाल्याचा दावा केला होता. या हल्ल्यात नियंत्रण रेषेपलीकडे म्हणजे पाकिस्तानमध़्ये दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला करून भारताने ३८ दहशतवादी ठार मारले.
अशी काही घटना घडलेली नाही आणि भविष्यातही तसे काही घडू देणार नाही आणि कोणी तसा प्रयत्न केला तर पूर्ण शक्तिनिशी त्याला प्रतिउत्तर दिले जाईल, असे बाज्वा म्हणाले. (वृत्तसंस्था)
>जगात पाक वेगळा पडला; दोष शरिफांचा
उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय तुच्छतेचा विषय बनल्यानंतर पाकचे माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तान आज जागतिक पातळीवर वेगळा पडला आहे त्याचा दोष पंतप्रधान नवाज शरीफ यांनाच द्यावा लागतो, असे म्हटले. ‘डॉन’ दैनिकाने रविवारी दिलेल्या वृत्तानुसार पाक जागतिक पातळीवर वेगळा पडत असताना शरीफ आपल्या देशबांधवांचे प्रेम संपादन करू शकत नाहीत,
असे मुशर्रफ म्हणाले. अविकसित पाकच्या स्थितीला मोठ्या पदांवर असलेला भ्रष्टाचार कारणीभूत आहे. शरीफ यांना पैशांबद्दल असलेल्या प्रचंड प्रेमामुळेच पाकिस्तानची ही अवस्था झाली आहे, अशी टीका इमरान खान यांनी केली होती.
>सर्जिकल स्ट्राइकबाबत वेट अॅण्ड वॉच
भारताच्या सर्जिकल स्ट्राइकबाबत पाकिस्तानने प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना यावर भाष्य करताना रविवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह
यांनी ‘वेट अॅण्ड वॉच’ असे सूचक वक्तव्य केले. येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, सैन्याने नियंत्रण रेषेच्या पलीकडे अतिरेकी अड्ड्यांवर कारवाई करून जगाला आपल्या शूरतेचे उदाहरण दाखवून दिले आहे. देशाला आणि पूर्ण जगाला या हल्ल्याची जाणीव आहे. आमच्या जवानांनी शूरवीरतेतून देशाचा बाणेदारपणा दाखवून दिला आहे.
>सुरक्षा दलाकडून ‘स्वच्छ एलओसी’ : नायडू
दहशतवाद्यांना रसद पुरविणाऱ्या शेजारी देशाला सडेतोड उत्तर देणाऱ्या आमच्या सैन्याने खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ एलओसी’ केली आहे, असे मत केंद्रीय सूचना आणि प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. मोदी काय आहेत ते आपण पाहिले आहे, असे सांगून नायडू म्हणाले की, स्वच्छ मन,
स्वच्छ धन, स्वच्छ तन आणि आता स्वच्छ सीमा, स्वच्छ एलओसी प्राप्त झाली आहे. महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचे आवाहन केले होते. आता पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आम्हाला स्वच्छाग्रही होण्याची आवश्यकता आहे, असेही व्यंकय्य नायडू म्हणाले.
>पाकला दहशतवादी देश जाहीर करा
वॉशिंग्टन : पाकिस्तान हा दहशतवादाला पाठिंबा देणारा देश असल्याचे जाहीर करावे अशी मागणी व्हाईट हाऊसकडे आॅनलाईन करणाऱ्या याचिकेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. तब्बल पाच दशलक्ष लोकांनी या याचिकेव स्वाक्षरी केली असून या याचिकेवर अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून प्रतिसाद लाभण्यासाठी जेवढ्या स्वाक्षऱ्यांची गरज असते त्यापेक्षा पाच पट स्वाक्षऱ्या या याचिकेने मिळविल्या आहेत.
आरजी एवढ्याच आद्याक्षरांनी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तिने २१ सप्टेंबर रोजी ही याचिका तयार केली होती. याचिकेला ३० दिवसांत एक लाख स्वाक्षऱ्यांची गरज असते. ही अट अवघ्या एका आठवड्यापेक्षाही कमी वेळेत पूर्ण झाली. सध्या ही याचिका व्हाईट हाऊसच्या संकेतस्थळावर अतिशय लोकप्रिय बनली आहे. या याचिकेला ओबामा प्रशासनाकडून ६० दिवसांत प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.