पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता अफगाणमध्ये प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:42 AM2019-07-08T05:42:08+5:302019-07-08T05:43:02+5:30

भारतीय दूतावासावर हल्ले होण्याची भीती; सतर्क राहण्याचा इशारा

Pakistani terrorists are now training in Afghanistan | पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता अफगाणमध्ये प्रशिक्षण

पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता अफगाणमध्ये प्रशिक्षण

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील बालाकोटवर भारतीय हवाई दलाने हल्ला चढवून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले. त्यानंतर जैश-ए-मोहम्मदने आपले दहशतवादी प्रशिक्षण तळ अफगाणिस्तानमधील कुनार, नांगरहार, नुरिस्तान, कंदाहार प्रांतामध्ये हलविले आहेत. ही माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाल्यानंतर अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासातील कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.


पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटवर हल्ला चढविला होता. त्यानंतर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी अफगाणिस्तानातील तालिबानी, हक्कानी नेटवर्क यांच्याशी संगनमत करून आपले प्रशिक्षण तळ त्या देशात हलविले. लष्कर-ए-तोयबाचे नेते व त्यांच्याशी संलग्न असलेल्या पाच धर्मादाय संस्थांवर इम्रान खान सरकारने १ जुलै रोजी केलेली कारवाई हे नाटक असल्याचे मोदी सरकारचे मत आहे.


पाकिस्तान व अफगाणिस्तानला लागून असलेल्या ड्युरँड रेषेच्या भागात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ हलविण्यात आले आहेत. फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानचा काळ्या यादीत समावेश करू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात येते.


जैश-ए-मोहम्मदचा नेता हाजी अब्दुल साफी याच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गट काबूलमधील भारतीय दूतावासावर हल्ले चढविण्याची भीती आहे. कारी वारी गुल या दहशतवाद्याचा गट भारतीय दूतावासावर स्फोटकांनी भरलेले वाहन धडकवून आत्मघाती हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाली आहे. कंदाहारमधील भारतीय वकिलातीवर तालिबानी हल्ला चढविण्याची शक्यता आहे.



मसूद अझर पाकिस्तानात सुरक्षित
पाकिस्तानातून जैश-ए-मोहम्मदचे अनेक दहशतवादी अफगाणिस्तानातील कोट, मोमंदरा (नांगरहार प्रांत), सनुगीन, मार्जा (हेल्मांड), लोगाना, नावा (गझनी), झुरमात (पक्तिता), कुनार, फर्याब, कुंदूज येथे गेले आहेत. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझर याला अफगाणिस्तानमध्ये आश्रय देण्याची तयारी हक्कानी नेटवर्कने गेल्या फेब्रुवारी महिन्यात दाखविली होती.
मात्र, पाकिस्तानी लष्कराच्या नजरेखाली भवालपूर येथे आपण सुरक्षित असल्याचे अझरला जाणवले. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने जानेवारी महिन्यात जैश-ए-मोहम्मदच्या सादिक अकबर, अतुल्ला या दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यावेळी या संघटनेच्या त्या देशातील वाढत्या कारवायांचा खºया अर्थाने सुगावा लागला होता. या दोघांनी भवालपूर, बालाकोटमधील दहशतवादी तळांमध्ये प्रशिक्षण घेतले होते.

Web Title: Pakistani terrorists are now training in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.