पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतीय अधिका-यांवर हेरगिरीचे आरोप

By admin | Published: November 3, 2016 03:00 PM2016-11-03T15:00:18+5:302016-11-03T15:05:15+5:30

पाकिस्तान रडीचा डाव खेळत असून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे

Pakistani vicarities, encroachment on Indian officials, vigilance | पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतीय अधिका-यांवर हेरगिरीचे आरोप

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, भारतीय अधिका-यांवर हेरगिरीचे आरोप

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद / नवी दिल्ली, दि. 3 - पाकिस्तानी हेराची पोलखोल करुन त्याला पुन्हा मायदेशी पाठवल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारण्यास सुरुवात केली असून भारतीय उच्चायुक्तालयातील अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आहे. आठ भारतीय अधिका-यांवर देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला असून त्यांची नावेही उघड केली आहेत. यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत चालला आहे. 
 
भारताने अगोदरच अधिका-यांना मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील मोहम्मद अख्तर या अधिका-याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सुटका केली होती. त्यानंतर भारताने मोहम्मद अख्तर याच्यासहित सहा अधिका-यांना तातडीने भारत सोडून जायला सांगितले होते.  
 
(हेरगिरी करणा-या पाक अधिका-यावर कारवाई, नंतर सुटका)
(हेरगिरीप्रकरणी चौथी अटक, सपा नेत्याचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात)
 
पाकिस्तानने सुरुवातीला फक्त दोन अधिका-यांवर आरोप केले होते, मात्र बुधवार संध्याकाळपर्यंत आकडा आठवर पोहोचला. हे अधिकारी रॉ किंवा गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताप्रमाणे राजेश कुमार अग्निहोत्री, बलबीर सिंग, अनुराग सिंग, अमरदीप सिंग भट्टी, धर्मेंद्र, विजय कुमार वर्मा, माधवन नंदा कुमार, जयाबालन सेंथिल अशी अधिका-यांची नावे आहेत. मात्र परराष्ट्र खात्याने या नावांना दुजोरा दिलेला नाही.
 
(हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकास अटक)
 
भारतीय अधिकारी हेरेगिरी करत होते, तसंच चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोअरमध्ये अडथळा आणण्याचा आणि देशात भीती, अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमधून केला जात आहे. पाकिस्तानमध्ये खबरींचं जाळं पसरवून, पाकिस्तानविरोधात पुरावे गोळा केले जात होते असाही दावा करण्यात आला आहे. 
 
दरम्यान भारताने तंबी दिल्यानंतर मायदेशी परतलेले पाकिस्तानी अधिकारी मायदेशी पोहोचले आहेत. भारताने केलेल्या कारवाईविरोधात राग म्हणून पाकिस्तान जशास तसं उत्तर देण्यासाठी ही कारवाई करत असल्याचं भारताने म्हटलं आहे.
 

Web Title: Pakistani vicarities, encroachment on Indian officials, vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.