पाकिस्तानात फडकला 'तिरंगा' अन् 'जय श्री राम'चा नारा, भारताच्या स्वातंत्र्यदिनी वेबसाइट्स हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:41 PM2020-08-15T14:41:19+5:302020-08-15T14:42:24+5:30
पाकिस्तानचे संकेतस्थळ peterco.com.pk हॅक करण्यात आले आहे.
आज 15 ऑगस्ट 2020 भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. याच दिवशी पाकिस्तानच्या संकेतस्थळांवरही (वेबसाइट्स) शुभेच्छांचे संदेश दिसून आले आहेत. मात्र, हे पाकिस्तानी लोकांनी केले नसून हॅकर्सकडून करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या फातिमा जिन्ना महिला विद्यापीठासह अन्य दुसऱ्या संकेतस्थळांवर तिरंगा ध्वज फडकविला जात आहे. अगदी राम मंदिराच्या फोटोसह राम मंदिर बांधण्यासंदर्भातही लिहिल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानचे संकेतस्थळ peterco.com.pk हॅक करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या होमपेजवर हे काम 'इंडियन सायबर ट्रूप' ने केल्याचे म्हटले आहे. पेजवर तिरंग्यासह 'सत्यमेव जयते' हे देखील लिहिलेले आहे. त्याखाली भारतीय तिरंगा ध्वज घेऊन मुले धावतांना दिसत आहेत. तसेच, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या संकेतस्थळाच्या पेजवर भगवान रामाचा एक मोठा फोटो दिसत आहे. त्याखाली लाहोर आणि कराचीमध्ये राम मंदिर बांधण्यात येणार असल्याचे लिहिले आहे. त्यानंतर देशासाठी शहीद झालेल्यांना सलाम करण्यात आला आहे. याशिवाय, फातिमा जिन्ना महिला विद्यापीठाचे संकेतस्थळही हॅक करण्यात आले. या संकेतस्थळावरही असेच फोटो दिसून येत आहेत. मात्र, सध्या त्याचे संकेतस्थळ ओपन होत नाही.
दरम्यान, कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन अतिशय साध्या पद्धतीने पार पडतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रथम राजघाटावर स्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहन पार पडले.