'भारतीय हेरा'च्या शोधात असलेली बेपत्ता पाकिस्तानी महिला पत्रकार अखेर दोन वर्षांनी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 11:40 AM2017-10-21T11:40:31+5:302017-10-21T11:47:28+5:30
दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2015 मध्ये लाहोरमधून बेपत्ता झालेली पाकिस्तानी महिला पत्रकार झीनत शहझादी अखेर बुधवारी रात्री पाकिस्तान सुरक्षा पथकांना सापडली.
लाहोर - दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट 2015 मध्ये लाहोरमधून बेपत्ता झालेली पाकिस्तानी महिला पत्रकार झीनत शहझादी अखेर बुधवारी रात्री पाकिस्तान सुरक्षा पथकांना सापडली. हेरगिरीचा आरोप असलेल्या भारतीय कैद्याचा शोध घेत असताना झीनत अचानक बेपत्ता झाली होती. शत्रूच्या गुप्चर संघटनेने झीनतचे अपहरण केले होते. त्यांच्या तावडीतून झीनतची सुटका केली असे निवृत्त न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी शुक्रवारी सांगितले. पाकिस्तानातील बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेणा-या आयोगाचे जावेद इक्बाल प्रमुख आहेत.
बलुचिस्तान आणि खैबर पखतूनख्वा प्रांतातील आदिवासी ज्येष्ठांनी झीनतला शोधण्यामध्ये मोलाची मदत केली. बुधवारी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर झीनत सापडली. झीनत बेपत्ता झाल्यानंतर तिचे कुटुंब आणि मानवी हक्क संघटेनेने पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेवरच संशय व्यक्त केला होता. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेनेच तिचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला होता.
25 वर्षांची झीनत मुक्त पत्रकार असून, पाकिस्तानातून बेपत्ता होणा-या लोकांच्या प्रश्नावर ती काम करते. सोशल मीडियावरुन ती हमीद अन्सारीची आई फौझिया अन्सारी यांच्या संपर्कात आली. हमीद अन्सारी पाकिस्तानातून बेपत्ता झाला होता. तिने पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाच्या मानवी हक्क विभागाकडे फौझिया अन्सारी यांच्यावतीने अर्ज दाखल केला. झीनतच्या प्रयत्नांमुळे बेपत्ता नागरीकांचा शोध घेणा-या आयोगाला हमीदचा शोध घ्यावा लागला.
या सर्वाचा परिणाम म्हणजे पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणांना हमीद त्यांच्या ताब्यात असल्याचे आयोगासमोर कबूल करावे लागले. झीनतचे अपहरण होण्याआधी पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी जबरदस्तीने तिला घेऊन गेले होते. त्यावेळी हमीद अन्सारीवरुन तिची तब्बल चार तास चौकशी केली होती असे झीनतच्या कुटुंबाने मानवी हक्क कार्यकर्त्यांना सांगितले होते. हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने 2015 साली हमीद अन्सारीला तीनवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्याचवर्षी झीनत बेपत्ता झाली. मार्च 2016 मध्ये झीनतचा भाऊ सद्दामने आत्महत्या केल्यानंतर तिच्या बेपत्ता असण्याविषयी पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा झाली.