पाकिस्तानी तरुणाने घराच्या भिंतीवर लिहिलं 'हिंदुस्तान जिंदाबाद', देशद्रोहाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 09:24 AM2017-12-05T09:24:48+5:302017-12-05T09:39:05+5:30
पाकिस्तानात घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिणा-या तरुणाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर-पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली आहे.
पेशावर - पाकिस्तानात घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिणा-या तरुणाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात अटक करण्यात आली आहे. खबर-पख्तूनख्वा प्रांतात ही घटना घडली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, साजीद शाह असं या तरुणाचं नाव आहे. नारा अमाजी परिसरात त्याचं घर आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घरावर छापा टाकत ही कारवाई केली. यावेळी त्याने आपल्या घराच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिलं असल्याचं पोलिसांना आढळलं.
साजीद शाहने आपल्या घराच्या बाहेरील बाजूच्या भिंतीवर 'हिंदुस्तान जिंदाबाद' लिहिलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं वृत्त डेली एक्स्प्रेसने दिलं आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साजिदला सात वर्षांची शिक्षा तसंच दंड ठोठावला जाऊ शकतो.
सोमवारी अटक केल्यानंतर साजिदला दंडाधिका-यांसमोर हजर करण्यात आलं होतं. त्याला एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांनी त्याला भिंतीवरुन हे वाक्य मिटवून टाकण्याचा सल्ला दिला होता. यामुळे राष्ट्रीय अभिमानाला ठेस पोहोचत असून, हे मिटवून टाक असं सांगत साजिदची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण साजिद ऐकत नसल्याचं पाहून काही लोकांनी आपल्या मोबाइल फोनवरुन फोटो काढत पोलिसांनी ई-मेल केले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत साजिदविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 'वरिष्ठ अधिका-यांनी दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे', अशी माहिती पोलीस अधिका-याने दिली आहे.
साजिद एका फॅक्टरीत काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याला भारतीय चित्रपट आणि गाण्यांची प्रचंड आवड आहे. साजिदवर भारतीय चित्रपटांचा इतका प्रभाव झाला आहे की, त्याने आता खुलेपणाने आपलं भारतप्रेम व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.