पाकिस्तानींवरही बंदी?
By admin | Published: January 31, 2017 12:43 AM2017-01-31T00:43:46+5:302017-01-31T00:43:46+5:30
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ज्या सात मुस्लीम बहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीमध्ये पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो,
वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ज्या सात मुस्लीम बहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीमध्ये पाकिस्तानचाही समावेश होऊ शकतो, असे संकेत ट्रम्प प्रशासनाने प्रथमच दिले. काँग्रेस आणि ओबामा प्रशासनाने अतिशय धोकादायक दहशतवाद ज्या सात देशांत सक्रिय असल्याचे ओळखले होते ते कारण पाकिस्तानबाबतही असल्याचे व्हाईट हाऊसचे चीफ आॅफ स्टाफ रिन्स प्रिबस यांनी म्हटले. त्या आधारे हे संकेत देण्यात आले आहेत.
आज फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती अमेरिकेत होऊ नये म्हणून ट्रम्प प्रशासनाने सात मुस्लीमबहुल देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे व यासाठी व्हाईट हाऊनने युरोपमध्ये वाढलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला.
इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, येमेन आणि सीरिया या देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणाऱ्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. या निर्णयावर जर्मनी, इंग्लड व फ्रान्सने जोरदार टीका केली आहे.
ट्रम्प यांच्या आदेशामुळे या सात देशांतील कोणालाही ९० दिवस प्रवेश दिला जाणार नाही. (वृत्तसंस्था)
बंदी हवीच : इम्रान खान
- पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे (पीटीआय) नेते इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लीमबहुल देशांवर घातलेली बंदी पाकिस्तानवरही असावी, अशीच इच्छा व्यक्त केली आहे.
- पाकिस्तानातील खूप शिकलेले, हुशार, बुद्धिमान लोक चांगल्या नोकऱ्यांसाठी अमेरिकेत जात आहेत. ते या बंदीमुळे थांबतील व देशासाठी काम करू लागतील.
- गुणवत्तेचे मोल समजणारी व्यवस्था पुन्हा आणली तर आमचे चांगले लोक परत येतील व देशासाठी काम करतील. गुणवत्तेचे मोल समजणारी व्यवस्था आम्ही पुन्हा आणली तर आमचे चांगले लोक परत येतील व देशासाठी काम करतील, असे खान यांनी म्हटले आहे.
एमिरेट्स एअरलाइन्स अडचणीत
- एमिरेट्सने अमेरिकेकडे जाणाऱ्या विमानांचे चालक आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्यावेळी कोणती कामे करावीत या क्रमातही बदल केले आहेत. ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशांतील नागरिकांना अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर एमिरेट्सने हा निर्णय घेतला.
- अमेरिकेच्या निर्णयामुळे विमानकंपन्यांना नव्या नियमांशी जुळवून घेण्यात अडचणी येत आहेत हेच सिद्ध केले. एमिरेट्सचे रोज अमेरिकेतील ११ शहरांत विमाने जातात.