पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी ३० मेपर्यंत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 01:13 AM2019-05-16T01:13:29+5:302019-05-16T01:14:26+5:30
पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
लाहोर : पाकिस्तानची हवाई हद्द भारतासाठी आता ३० मेपर्यंत बंद राहणार आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांचा निकाल येण्याची पाकिस्तानला प्रतीक्षा आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारताने २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैशच्या अतिरेकी तळावर भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे हल्ला केल्यानंतर पाकने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले होते. पाकने २७ मार्च रोजी एका निर्णयाद्वारे नवी दिल्ली, बँकॉक, क्वालालंपूर वगळता सर्व उड्डाणांसाठी हवाई हद्द खुली केली होती.
एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले की, संरक्षण व उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक झाली. भारतीय उड्डाणांसाठी आपली हवाई हद्द खुली करण्यावर फेरविचार करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठरल्यानुसार, पाकिस्तानची हवाई हद्द आता ३० मेपर्यंत भारतासाठी बंद राहील. आता भारतासाठी हवाई हद्द खुली करण्यावर ३० मे रोजी पुन्हा विचार करण्यात येईल.
पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनी या आठवड्याच्या सुरुवातीस सांगितले होते की, भारतात निवडणुकांचे निकाल येईपर्यंत हवाई हद्द खोलण्याबाबतचा निर्णय ‘जैसे थे’ राहील. निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन होईपर्यंत भारत-पाक संबंधांमध्ये काही सुधारणा होईल, असे दिसत नाही. दोन्ही देशांतील एकमेकांच्या हवाई हद्दीतील बंदी भारतात नवे सरकार स्थापन होईपर्यंत कायम राहील, असे वाटते.
भारताने पाकिस्तानला हवाई हद्दीची बंदी केल्यामुळे पाकने बँकॉक, क्वालालंपूरसाठीची उड्डाणे रद्द केली असून, त्यामुळे त्या देशाला दररोज लाखो रुपयांचा फटका बसत आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून (पीआयए) क्वालालंपूरसाठी चार तसेच बँकॉक व दिल्लीसाठी दररोज प्रत्येकी दोन विमाने पाठवली जात होती. पीआयएच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, बँकॉक व क्वालालंपूरची उड्डाणे बंद झाल्यामुळे अब्जावधी रुपयांची झळ सोसावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर पाकला इतर एअरलाइन्सचे प्रवासीही गमवावे लागत आहेत. भारत- पाकिस्तानदरम्यान रस्ते व रेल्वे वाहतूक सुरू आहे, तर मग हवाई हद्द खुली करण्यात काय गैर आहे, असा सवालही या अधिकाºयाने केला.
प्रवाशांना आर्थिक फटका
पाकिस्तानची हवाई हद्द अत्यंत महत्त्वाच्या उड्डयन कॉरिडॉरमध्ये येते. त्यामुळे भारतात येणारी बहुतांश विमाने पाकच्या हवाई हद्दीतून येतात. या प्रतिबंधामुळे भारत व पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या दोन्ही देशांबरोबरच युरोप व इतर देशांनाही आर्थिक फटका बसत आहे. कारण विमान उड्डाणांचाही कालावधी वाढला आहे. त्यामुळे तिकिटेही महागली आहेत.