पाकचा प्रताप, नेपाळमधील भूकंपग्रस्तांना मदतीमध्ये दिले गोमांस
By admin | Published: April 30, 2015 11:39 AM2015-04-30T11:39:36+5:302015-04-30T14:03:55+5:30
भूकंपग्रस्त नेपाळमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरु असून पाकिस्तानने मात्र भूकंपग्रस्तांना मदत म्हणून चक्क गोमांस पाठवल्याने वाद निर्माण झाला आहे.
काठमांडू, दि. ३० - भूकंपग्रस्त नेपाळमध्ये जगभरातून मदतीचा ओघ सुरु असून पाकिस्तानने मात्र भूकंपग्रस्तांना मदत म्हणून चक्क गोमांस पाठवत नेपाळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रताप केला आहे. सर्वाधिक हिंदू असलेल्या नेपाळमध्ये गाय ही पवित्र मानली जाते व गोमांस पाठवून पाकिस्तानने नेपाळच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नेपाळींनीही ही अन्नाची पाकिटं स्वीकारण्यास नकार दिला आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी आलेल्या भीषण भूकंपात नेपाळमध्ये सुमारे पाच हजारहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे काठमांडूसह ग्रामीण भागांमधील जनजीवन विस्कळीत असून भारतासह विविध देश नेपाळमध्ये मदतकार्य करत आहे. पाकिस्ताननेही नेपाळमध्ये अन्नाची पाकिटं, ब्लॅंकेट व अन्य वस्तू मदत म्हणून पाठवल्या आहेत. मात्र पाकने अन्नाच्या पाकिटात थेट गोमांस पाठवल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
नेपाळमध्ये मदतकार्यासाठी गेलेल्या दिल्लीतील डॉक्टरांच्या चमूने ही माहिती दिली आहे. मंगळवारी पाकिस्तानने नेपाळमध्ये अन्नाची पाकिट पाठवली होती. ही खाद्यसामग्री घेण्यासाठी या डॉक्टरांचे पथक विमानतळावर गेले होते. पण यामध्ये गोमांस असलेले बीफ मसाल्याची रेडी टू इट पाकिट आढळली. डॉक्टरांनी ही पाकिट स्वीकारली नाहीत. सुरुवातीला स्थानिकांनाही या पाकिटांमध्ये नेमके काय आहे हे माहित नव्हते. मात्र त्यांना सत्यपरिस्थिती समजताच त्यांनी ही पाकिटं परत केली असे एका डॉक्टराने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले आहे.
नेपाळ सरकारनेही याची दखल घेतली असून या पाकिटात नेमके काय होते याचा तपास सुरु आहे. यामध्ये गोमांस आढळल्यास आम्ही राजनैतिक पातळीवर पाकसमोर हा मुद्दा मांडू असे नेपाळमधील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.