पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 06:15 PM2024-11-21T18:15:19+5:302024-11-21T18:16:32+5:30
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील हा गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यात गुरुवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला. बंदूकधाऱ्यांनी पॅसेंजर ट्रेनवर गोळीबार केला. यात 39 जणांचा मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे. महत्वाचे म्हणजे, पाकिस्तानातील हा गेल्या आठ वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.
संबंधित वाहनांचा ताफा पाराचिनारहून पेशावरकडे जात असताना कुर्रम जिल्ह्यातील उचाट भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हा हल्ला केला.
या घटनेची माहिती देताना खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्य सचिव नदीम अस्लम चौधरी म्हणाले, “कुर्रम आदिवासी जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. ही एक मोठी शोकांतिका आहे आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.
पाराचिनारचे स्थानिक रहिवासी झियारत हुसैन यांनी दूरध्वनीवरून रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “प्रवासी वाहनांचे दोन ताफे होते. एक ताफा पेशावरकडून पाराचिनारकडे, तर दुसरा पाराचिनारकडून पेशावरकडे जात होता. याच वेळी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.” यावेळी झियारत हुसैनचे नातलग पेशावरहून पाराचिनारला जात होते.
पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रामुख्याने बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी या घटनेचा निषेध केला आणि पीडितेच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच, दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.