'काश्मीर सोडा, अफगाणिस्तानवर बोला'; जपानसमोर पाकिस्तान तोंडघशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 03:02 PM2018-04-13T15:02:38+5:302018-04-13T15:02:38+5:30
जपानच्या राजदूतांसमोर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तोंडावर पडले
इस्लामाबाद: आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्मीर राग आळवणारा पाकिस्तान तोंडावर पडला आहे. जपानकडे काश्मीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला मोठी नामुष्की सहन करावी लागली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नासिर खान जंजुआ यांनी जपानचे राजदूत तकाशी कुराई यांच्याकडे एका बैठकीदरम्यान काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र जपानी राजदूतांनी काश्मीरचा विषय टाळून अफगाणिस्तानच्या विषयाला हात घातला. त्यामुळे पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची पंचाईत झाली.
'काश्मीरमधील स्थितीवरुन जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी भारतीय लष्कराकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जातो,' असे नासिर खान जंजुआ यांनी तकाशी कुराई यांनी सांगितलं. मात्र कुराई यांनी उत्तर कोरिया आणि अमेरिकेतील ताणलेल्या संबंधांवर चर्चा सुरू केली. यानंतर त्यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीकडे जंजुआ यांचं लक्ष वेधलं. त्यामुळे काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसला.
जपानी राजदूतांनी अचानक अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केल्यानं पाकिस्तानला धक्का बसला. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती जंजुआ यांनी कुराई यांना दिली. 'पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी नुकताच अफगाणिस्तानाचा दौरा केला. त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तान घेत असलेल्या प्रयत्नांचं कौतुकदेखील केलं,' असं जंजुआ यांनी कुराई यांना सांगितलं.