पाकिस्तानचे संरक्षणमंत्री म्हणतात, 'अमेरिकेच्या सैन्यासोबत छुपे संबंध ठेवणार नाही, आम्हाला बळीचा बकरा बनवलं जातंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 02:03 PM2018-01-10T14:03:15+5:302018-01-10T14:59:35+5:30
पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानने अमेरिकेसोबत सैन्य आणि गुप्त संबंध तोडणार असल्याची घोषणा केली आहे. द डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आरोपांनंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर खोटारडेपणाचा आणि धोका दिल्याचा आरोप केला होता. यानंतर ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुरक्षेसाठी देण्यात येणारी आर्थित मदत थांबवली होती. यावर टीका करताना पाकिस्तानचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान बोलले आहेत की, 'करोडो डॉलर खर्च केल्यानंतरही अमेरिकेला अफगाणिस्तानात पराभवचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमधील आपलं अपयश झाकण्यासाठी अमेरिका पाकिस्तानला बळीचा बकरा म्हणून वापरत आहेत. यासाठी आम्ही अमेरिकेच्या सैन्यासोबतचे आणि गुप्त संबंध तोडत आहोत'.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान आपल्या बलिदानाची किंमत नाही मागत आहे. यासोबत अमेरिकेला खडे बोल सुनावताना ते बोलले की, 'पाकिस्तानच्या जमिनीवरुन अमेरिकेला अफगाणिस्तानसोबत युद्ध लढण्याची परवानगी दिली जाणार नाही. अमेरिका अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवरील सुरक्षेसाठी मदत देण्याऐवजी पाकिस्तानवर आरोप लगावण्यात व्यस्त आहे'.
यासंबंधी पाकिस्तानमधील अमेरिकी दुतावासाशी संपर्क साधला असता आपल्याला अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दुतावासचे प्रवक्ता रिचर्ड स्नेलसर यांनी सांगितलं की, 'आर्थिक मदत बंद करण्यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही'. दुसरीकडे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अमेरिकेसोबत चीन, इराण आणि रशियासोबत पाकिस्तानचे संबंध चांगले असणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे.
दुसरीकडे अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसहित त्यांच्या जमिनीवरुन कार्यरत असणा-या सर्व दहशतवादी संघटनांशी लढा देण्यासाठी निर्णयाक पाऊलं उचलण्यास सांगितलं आहे.
दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानला भरभरून मदत केली पण त्याच्या बदल्यात पाकिस्तानकडून अमेरिकेला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच मिळाली, असे खडे बोल सुनावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून दिली जाणारी २५५ दशलक्ष डॉलरची वार्षिक मदत बंद करण्याचे संकेत सोमवारी दिले होते.
गेल्या १५ वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानला ३३ अब्ज डॉलरहून अधिक आर्थिक मदत करण्याचा मूर्खपणा केला आणि आमचे (अमेरिकेचे) नेते मूर्ख आहेत, असे समजून त्या बदल्यात त्यांच्याकडून आमच्या वाट्याला फक्त खोटारडेपणा आणि फसवणूकच आली. आता बस्स झाले!, असे आक्रमक स्वरुपाचे ट्विट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फटकारलं.
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देते असा आरोप करत ट्रम्प यांनी लिहिले की,' शेजारच्या अफगाणिस्तानात अमेरिका ज्या दहशतवाद्यांच्या मागावर आहे त्यांना पकडण्यास मदत करण्याऐवजी पाक त्यांना आश्रय देते'.