स्वावलंबी होण्याच्या पाकच्या स्वप्नांचा चुराडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:36 AM2019-05-20T04:36:30+5:302019-05-20T04:36:39+5:30
तेलाच्या विहिरी निघाल्या कोरड्या : १० कोटी डॉलर खर्च गेला वाया
कराची : आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान तेलाच्या बाबतीत स्वावलंबी होण्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. मोठ्या आशेने कराची किनारपट्टीलगत अरबी समुद्रात खोलवर खोदण्यात आलेल्या विहिरीत तेलाचा पत्ता नसल्याचे आढळल्याने पाकिस्तानचा स्वप्नभंग झाला आहे.
तेल वा वायू न आढळल्याने कराचीनजीक खोल समुद्रात केक्रा-१ विहीर खोदण्याचे काम थांबविण्यात आले आहे, असे पंतप्रधान इम्रान खान यांचे पेट्रोलियमविषयक विशेष सहायक नदीम बाबर यांनी सांगितले. अरबी समुद्रातील पाकिस्तानच्या सागरी हद्दीत तेल आणि वायूचे साठे आढळतील, अशी आशा पाकिस्तानला होती. या आशेने पाकिस्तानने एक्सॉनमोबिल (अमेरिका), ईएनआय (इटली) आणि अन्य कंपन्यांनी चार महिन्यांपूर्वी या भागात मोठ्या जोमाने विहिरी खोदण्याचे काम सुरू केले होते. तेल न आढळल्याने हे काम थांबविण्यात आले आहे.
कराची किनारपट्टीलगतच्या केक्रा-१ क्षेत्रात ५,५०० मीटर खोल तेलाच्या उत्खननासाठी विहिरी खोदण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, निष्कर्ष अहवालही देण्यात आला आहे, असे बाबर यांनी जियो न्यूजला सांगितले. या प्रकल्पासाठी तब्ब्बल १० कोटी डॉलर (पाकिस्तानी रुपयांत १,५०० कोटी) खर्च झाले. १७ वेळा प्रयत्न करूनही पाकिस्तानला यश मिळाले नाही.
कराची किनारपट्टीलगत अरबी समुद्रातील पाकिस्तानच्या सागरी हद्दीत तेलाचे मोठे भांडार असल्याचे कळाल्याने आता पाकिस्तानला बाहेरून तेल खरेदी करावे लागणार नाही, दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला केला होता.