पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट, देश चालवण्यासाठीही पैसा नाही; इम्रान खान यांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:37 AM2021-11-25T10:37:18+5:302021-11-25T10:37:58+5:30
सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं.
इस्लामाबाद : देशाची स्थिती अतिशय बिकट आहे. देश चालवायलाही पैसा नाही. लोक करही भरत नाहीत. त्यामुळे देश चालवण्यासाठी अन्य देशांकडून सतत कर्ज घ्यावे लागत आहे. विदेशी कर्ज आणि महसुलातील घट याचा राष्ट्रीय सुरक्षेवरही परिणाम होत आहे, अशी कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:हूनच दिली आहे.
सरकारकडे पैसा नसल्याने विकासाची कामे आणि लोककल्याणाची कामे थांबली आहेत, असे सांगून इम्रान खान म्हणाले की, कर भरायचे नसतात, असेच देशातील लोकांना वाटतं. त्यामुळे महसूल गोळाच होत नाही. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी अन्य देशांकडे आपल्याला हात पसरावे लागत आहेत. आधीच्या सरकारांनी देशाला कर्जाच्या खाईत लोटले. त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
राष्ट्रीय महसूल मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते म्हणाले की, आपल्या राजकारण्यांनी ब्रिटिशांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पाकिस्तानच्या पन्नास पट उत्पन्न असलेल्या ब्रिटनचे मंत्री परदेशातही इकॉनॉमी क्लासने जातात. देशाचा पैसा वाचवावा, यासाठी ते दूतावासात मुक्काम करतात.