पाकमध्ये ३९ दहशतवाद्यांचा खात्मा
By admin | Published: February 18, 2017 01:38 AM2017-02-18T01:38:46+5:302017-02-18T01:38:46+5:30
इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांविरुद्ध
इस्लामाबाद : इस्लामिक स्टेटने सिंध प्रांतातील सूफी दर्ग्यावर केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी शुक्रवारी दहशतवाद्यांविरुद्ध देशव्यापी धडक कारवाई सुरू केली असून, त्यात ३९ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
लाल शाहबाज कलंदर येथे गुरुवारी आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यात १00 भाविक ठार, तर २५० हून अधिक जखमी झाले होते. लष्कर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करीत असतानाही या आठवड्यात देशात अनेक हल्ले झाले. सुफी दर्ग्यावरील हल्ला सर्वात घातक होता.
पाकचे निमलष्करी दल असलेल्या सिंध रेंजर्सने सिंध प्रांतात रकेलेल्या कारवाईत १८ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. निमलष्करी जवान सेहवान (सूफी दर्गा जेथे आहे ते ठिकाण) येथून परतत असताना काथोरजवळ रस्त्यावर त्यांना दहशतवादी आढळून आले. जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात सात जण मारले गेले. उर्वरित ११ दहशतवाद्यांचा कराचीत खात्मा करण्यात आला. वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात १२ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पेशावरमध्ये तीन, ओरकझाई आदिवासी भागात ४, तर बान्नू येथे ४ जणांना मारण्यात आले. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
खुर्रम आणि मोहंमद भागातील स्वतंत्र घटनांत तीन दहशतवादी मारले गेले. यावेळच्या चकमकीत एक जवानही मृत्युमुखी पडला. बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. पंजाब प्रांतातील सरगोधा येथे दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सरकारने दहशतवादाचा नायनाट करण्याचा संकल्प केला असल्यामुळे ही कारवाई येत्या काही दिवसांत आणखी तीव्र होईल. गेल्या आठवड्यात देशात एकापाठोपाठ हल्ले झाल्यानंतर सरकार आणि लष्कर कारवाई आवश्यक असल्याचे निष्कर्षाप्रत आले आणि कारवाई सुरू झाली.
पाकिस्तान लष्कराने पाक-अफगाण सीमेजवळील शालमान भागात मोहीम सुरू केली असून, यात तोफांचाही वापर करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना पळून जाता येऊ नये म्हणून पाक-अफगाण सीमा तोखराम येथे बंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात पाकमध्ये एकापाठोपाठ आठ दहशतवादी हल्ले झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारांनी एकापाठोपाठ कारवाई सुरू केली. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी घेतलेल्या बैठकीत सहभागी उच्चपदस्थांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सहमती दर्शविली होती. सुफी दर्ग्यावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने आपल्या आमाक या वृत्तसंस्थेद्वारे स्वीकारली होती. (वृत्तसंस्था)
दहशतवादी आमच्याकडे सोपवा
पाकिस्तानी लष्कराने ७६ वॉन्टेड (हवे असलेले) दहशतवाद्यांची यादी अफगाणिस्तानला दिली आहे. हे दहशतवादी अफगाण भागात दडून बसलेले आहेत.
अफगाणिस्तानने या दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशी मागणी पाकने केली आहे.
अफगाण दूतावासाच्या एका अधिकाऱ्याला रावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात पाचारण करण्यात आले होते, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसीफ गफूर यांनी सांगितले.
या दहशतवाद्यांवर कारवाई करावी वा त्यांना पाकच्या स्वाधीन करावे, असे त्यांना सांगण्यात आले. तथापि, लष्कराने अफगाणिस्तानला दिलेल्या यादीतील दहशतवाद्यांची नावे उघड केली नाहीत.