दहशतवादी हाफिझ सईदची संघटना लढवणार 2018 साली होणारी पाकिस्तानची सार्वत्रिक निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 10:20 PM2017-09-18T22:20:48+5:302017-09-18T22:23:28+5:30
लाहोर, दि. 18 - 26/11 च्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड आणि भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करत असलेला कुख्यात दहशतवादी हाफीझ सईदची संघटना आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. हाफिझ सईदची जमात उल दावा पुढच्या वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. जमात उल दावा या दहशतवादी संघटनेने गेल्या महिन्यात मिल्ली मुस्लिम लीग नावाचा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.
लाहोरमध्ये नॅशनल असेंब्लीच्या एनए-120 जागेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जमात उल दावाचा पाठिंबा असलेले उमेदवार शेख याकूब याचे नामांकन रद्द झाले होते. या मतदार संघातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरिफ यांची पत्नी कुलसूम नवाझ विजयी झाली होती. तर पाकिस्तान तहरिक - ए- इन्साफ पक्षाची उमेदवार यास्मिन रशिद तिसऱ्या स्थानी राहिली होती.
याबाबत याकूब म्हणाला, "ही संघटना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात आपले उमेदवार उभे करणार आहे." याकूब हा मिल्ली मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली एनए-120 मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होता. मात्र त्याला असे करता आले नाही. कारण हा पक्ष पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडे अद्याप नोंदणीकृत झालेला नाही. अमेरिकी वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकी वित्त विभागाने 2012 साली प्रसिद्ध केलेल्या बंदी घालण्यात आलेल्या लोकांच्या यादीत याकुबचेही नाव होते.
निवडणुकीतील अनुभवाबाबत याकुब म्हणाला, "आम्हाला एनए 120 मतदारसंघात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आम्ही राजकीय मैदानात पाय रोवण्यासाठी आलो आहोत, असा संदेश आम्ही जनतेला दिला आहे. लोकांनाही पाकिस्तानला भारत, अमेरिका आणि इस्राइलसारख्या शत्रूंविरोधात प्रबळ बनवणारा आणि मुलभूल समस्या सोडवणारा पक्ष हवा आहे.
2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असे नाव देण्यात आले होते. 'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. हाफिज पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आहे. भारतातील विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये तोयबाचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भारताबरोबरच आंतरराष्ट्रीय सुमदायाने तोयबावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला होता. या दबावानंतर समाजसेवा करत असल्याचे भासवण्यासाठी हाफिजने जमात उल दावाची स्थापना केली. मात्र, हाफिजची ही चतुराई फार काळ टिकली नाही. अमेरिकेने 2014 मध्येच जमात उल दावालाही दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते.