पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ यांचे निधन

By Admin | Published: August 12, 2016 03:54 AM2016-08-12T03:54:55+5:302016-08-12T03:54:55+5:30

प्रदीर्घ काळापासून फुफ्फुसांच्या कॅन्सरविरुध्द झुंज देत असलेले पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचे गुरुवारी निधन झाले

Pakistan's great cricketer Hanif passes away | पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ यांचे निधन

पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ यांचे निधन

googlenewsNext

कराची : प्रदीर्घ काळापासून फुफ्फुसांच्या कॅन्सरविरुध्द झुंज देत असलेले पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांचे गुरुवारी निधन झाले. येथील आगा खान रुग्णालयात हनीफ यांच्यावर उपचार सुरु होते. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी ८१वर्षीय या दिग्गज क्रिकेटपटूच्या निधनाची अधिकृत माहिती दिली.
रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘श्वसनासंबंधी असलेल्या अडचणीमुळे त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.’’ दखल घेण्याची बाब म्हणजे याआधी उपचारादरम्यान हृदयाचे ठोके सहा मिनिटांसाठी बंद पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ‘वैद्यकिय आधारे’ मृत घोषित केले होते. मात्र, यानंतर हनीफ यांच्या हृदयाचे ठोके सुरु करण्यात डॉक्टरांना यश आले होते. तसेच हनीफ यांचे पुत्र शोएब मोहम्मद यांनी रुग्णालयातून अनेक वृत्तवाहिन्यांना हनीफ यांच्या निधनाची माहिती दिल्यानंतर ते जीवित असल्याची घोषणा केली होती.
शोएब यांनी सांगितले की, ‘‘उपचारादरम्यान सहा मिनीटे हृदयाचे ठोके बंद पडल्याने डॉक्टरांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. मात्र, ते सुखरुप असून हीच आमच्यासाठी सर्वात मोठी बाब आहे.’’ मात्र यानंतर काही तासांनीच शोएब यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. शोएब यांनी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, ‘‘वडिलांनी आजाराविरुध्द अखेरपर्यंत लढत दिली. चार वर्षांपुर्वी फुफ्फुसांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर ते आजारी असायचे. त्यांच्या चाहत्यांना विनंती आहे की, त्यांनी वडिलांना स्वर्गप्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करावी.’’ (वृत्तसंस्था)


‘दी लिटिल मास्टर’ या नावाने प्रसिध्द असलेल्या हनीफ यांचा जन्म २१ डिसेंबर १९३४ साली जूनागढ येथे झाला. १९५२-५३ ते १९६९-७० या दरम्यान त्यांनी ५५ कसोटी सामने खेळताना हनीफ यांनी ४३.९८च्या शानदार सरासरीने ३९१५ धावा काढल्या आहेत. शिवाय यामध्ये त्यांनी १२ वेळा शतकही ठोकले आहेत.

हनीफ यांना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये गणले जाते. १९५७-५८ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुध्द ब्रिजटाऊन कसोटीमध्ये केलेली तब्बल ३३७ धावांच्या मॅरेथॉन खेळीचा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळींमध्ये समावेश आहे. या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने तो सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते.

आयसीसीकडून श्रध्दांजली... ‘‘सुरुवातीपासून आयसीसी हॉल आॅफ फेममध्ये समावेश असलेले दिग्गज क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद अनेक फलंदाजांसाठी प्रेरणास्त्रोत होते,’’ अशा शब्दांत आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड रिचडर््सन यांनी हनीफ यांना श्रध्दांजली वाहिली.

गोंधळाचे वातावरण... दखल घेण्याची बाब म्हणजे, हनीफ यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरवली. मात्र, सहा मिनिटांनी पुन्हा हृदयाचे ठोके सुरु झाल्यानंतर हनीफ सुखरुप असल्याचे वृत्त फिरु लागले.

Web Title: Pakistan's great cricketer Hanif passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.