पाकिस्तानचे हेलिकॉप्टर आम्हीच क्षेपणास्त्राने पाडले

By admin | Published: May 10, 2015 11:35 PM2015-05-10T23:35:42+5:302015-05-10T23:42:12+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्ही जमिनीवरून हवेत हल्ला करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा पाकिस्तानी तालिबान्यांनी रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे.

Pakistan's helicopter was hit by the missile | पाकिस्तानचे हेलिकॉप्टर आम्हीच क्षेपणास्त्राने पाडले

पाकिस्तानचे हेलिकॉप्टर आम्हीच क्षेपणास्त्राने पाडले

Next

इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आम्ही जमिनीवरून हवेत हल्ला करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राने हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा पाकिस्तानी तालिबान्यांनी रविवारी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये केला आहे. तालिबानचे अतिरेकी हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रासह त्यात दिसत आहेत. तालिबानच्या दाव्यानुसार या क्षेपणास्त्राने त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी पाडले. यात नॉर्वे आणि फिलिपाईन्सच्या राजदूतांसह सात जण ठार झाले.
हा व्हिडिओ जिहादी फोरमने प्रसिद्धीस दिला असून, त्यात चेहरा झाकलेले किमान चार अतिरेकी जमिनीवरून हवेत हल्ला करू शकणारे क्षेपणास्त्र एसएएम-७ बीसह दिसतात. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तानच्या नलतार खोऱ्यात एमआय १७ हेलिकॉप्टरला खाली पाडण्यासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला गेला होता.
व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी उर्दू भाषेत असलेल्या संदेशात तालिबान्यांचा दावा असा आहे की, हे क्षेपणास्त्र हेलिकॉप्टर वळण घेत असताना त्याच्या मागच्या भागावर लागले व त्यामुळेच ते हवेत नष्ट झाले. हे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी तीन किलोमीटर दूर अंतरावरून क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते, असेही संदेशात म्हटले आहे.
परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी शनिवारी तालिबानचा वरील दावा फेटाळला व हेलिकॉप्टरचे इंजिन बिघडल्यामुळे ते कोसळल्याचे प्रारंभिक चौकशीत दिसते, असेही म्हटले होते.

सरकार कोणता दावा करते यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही, असे तालिबानने निवेदनात म्हटले आहे. दुर्घटनेनंतर टीटीपीचे मुख्य प्रवक्ते मुहम्मद खुरसानी यांनी दावा केला की, हेलिकॉप्टरला विमानभेदी क्षेपणास्त्राने पाडण्यात आले व त्यात पायलटसह काही विदेशी राजदूतांचा मृत्यू झाला. तहरिक- ए- तालिबान पाकिस्तानच्या विशेष गटाने नवाज शरीफ यांच्या दौऱ्यात त्यांना लक्ष्य करण्याची खास योजना तयार केली होती; परंतु ते दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करीत होते म्हणून वाचले, असेही खुरासानी म्हणाले. तथापि, पाकिस्तानी लष्कराने अतिरेकी किंवा दहशतवादी कारवायांचा या प्रकरणात इन्कार केला असून हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचा दावा केला आहे.


> रशियन बनावटीचे एसएएम-७ किंवा एसएएम-७ बी लक्ष्यावर तीन किलोमीटर अंतरावरून हल्ला करू शकते. अतिरेकी गटांच्या कारवायांवर लक्ष असलेल्या अमेरिकेतील एसआयटीई इंटेलिजन्स ग्रुपने आपल्या संकेतस्थळावर हा व्हिडिओ टाकला आहे. तालिबानने रविवारी निवेदनात ‘अल्लाच्या कृपेमुळे आम्ही असे आणखी हल्ले करू’ असे म्हटले. हे हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा केलेल्या तालिबान्यांनी आमचे लक्ष्य पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ होते, असेही म्हटले.

Web Title: Pakistan's helicopter was hit by the missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.