Pakistan ISI Agent Arrested: पाकिस्तानची ISI अडकली! व्हाईट हाऊस, पेंटागॉनमध्ये 'घुसण्याचा' प्रयत्न; अमेरिकेने उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:41 IST2022-04-08T15:39:47+5:302022-04-08T15:41:17+5:30
Pakistan ISI Agent in America: धक्कादायक बाब म्हणजे ते स्वत:ला अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयचे एजंट असल्याचे सांगत होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या चार एजंटांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

Pakistan ISI Agent Arrested: पाकिस्तानची ISI अडकली! व्हाईट हाऊस, पेंटागॉनमध्ये 'घुसण्याचा' प्रयत्न; अमेरिकेने उधळला
एकीक़डे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या खूर्चीवरील संकटावर अमेरिकेवर गंभीर आरोप केलेले असताना आता पाकिस्तानची गुप्तचर संघटनेची मोठी खेळी अमेरिकेने उधळून लावली आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस, पेंटागॉनमध्ये गुप्त माहिती चोरण्यासाठी आयएसआयचे एजंट प्रयत्न करत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते स्वत:ला अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआयचे एजंट असल्याचे सांगत होते.
एरियन ताहेरजादेह (40) आणि हैदर अली (35) या दोघांना अमेरिकेच्या एफबीआयवने दक्षिण पूर्व वाशिंगटनमधून अटक केली आहे. त्यांनी अमेरिकी अधिकारी असल्याचे सांगून चुकीची ओळख सांगितल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. सहाय्यक यूएस ऍटर्नी जोशुआ रॉथस्टीन यांनी कोलंबिया जिल्ह्यातील यूएस जिल्हा न्यायालयात मॅजिस्ट्रेट न्यायाधीश जी मायकेल हार्वे यांना सांगितले की, अलीने तो आयएसआयशी संबंधीत असल्याचे म्हटले आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की अलीकडे पाकिस्तान आणि इराणचे अनेक व्हिसा आहेत. आम्ही त्याच्या दाव्यांच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही, परंतु त्याने पाकिस्तानच्या गुप्तचर सेवा आयएसआयशी संबंध असल्याचा दावा साक्षीदारांसमोर केला आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांशी संबंध वाढविण्यासाठी त्याने खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचेही आरोप करण्यात आला आहे.
या दोघांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच्याकडून फायदा घेतलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या चार एजंटांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. ताहेरजादेह आणि अली यांना पुढील सुनावणीपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत.