पाकिस्तानच्या नव्या राष्ट्रपतींचे जवाहरलाल नेहरुंशी जुने नाते...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 05:46 PM2018-09-05T17:46:19+5:302018-09-05T17:48:48+5:30
पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी आज आरिफ अल्वी यांची निवड झाली. अल्वी यांचे भारतासोबत जुने नाते आहे.
नवी दिल्ली/ लाहोर : पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदी आज आरिफ अल्वी यांची निवड झाली. अल्वी यांचे भारतासोबत जुने नाते आहे. आरिफ अल्वी यांचे वडील फाळणीपूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे डेंटिस्ट होते. ही माहिती पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली आहे.
फाळणीपूर्वीच्या कराचीमध्ये आरिफ यांच्या वडीलांचा जन्म झाला होता. फाळणीवेळी त्यांनी पाकिस्तानातच राहण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी हे देखील डेंटिस्ट आहेत.
अल्वी यांची राजकीय कारकीर्द 5 दशकांपूर्वी सुरु झाली होती. ते मॉन्टमानरेंसी कॉलेज ऑफ डेन्टिस्ट्रीमध्ये शिकत होते. यावेळी ते जमात-ए-इस्लामी या विद्यार्थ्यांच्या गटाशी संबंधीत होते. तसेच जनरल अयूब खान यांच्या हुकुमशाहीविरोधातील आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. यावेळी एका आंदोलनात त्यांना बंदुकीची गोळीही लागली होती. आजही त्यांच्या डाव्या हातामध्ये गोळीचा काही भाग शिल्लक आहे.
पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या पक्षाची स्थापना अल्वी यांनीच केली होती. ते या पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी पहिल्यांदा जमात-ए-इस्लामीच्या तिकिटावर 1979 मध्ये निवडणूक लढविली होती. मात्र त्यांना पराजयाचा सामना करावा लागला होता. यानंतर त्यांनी 1996 मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ पार्टीची स्थापना केली आणि 1997 मध्ये निवडणूक लढविली. यावेळीही त्यांच्या पदरी पराभव आला. मात्र, त्यांच्या कामांमुळे त्यांना पक्षातील मोठी पदे मिळत गेली. 2013 मध्ये ते कराचीमधून पहिल्यांदा निवडून आहे. 2018 मध्ये पुन्हा त्यांना विजय मिळाला.