पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट, 151 लोकांचा होरपळून मृत्यू

By admin | Published: June 26, 2017 01:10 AM2017-06-26T01:10:18+5:302017-06-26T04:43:52+5:30

पाकिस्तानात रस्त्यावर उलटलेल्या टँकरमधून गळालेले तेल गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्यानंतर अचानक टँकरचा स्फोट होऊन

Pakistan's oil tanker exploded, killing 151 people | पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट, 151 लोकांचा होरपळून मृत्यू

पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरचा स्फोट, 151 लोकांचा होरपळून मृत्यू

Next

लाहोर : पाकिस्तानात रस्त्यावर उलटलेल्या टँकरमधून गळालेले तेल गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाल्यानंतर अचानक टँकरचा स्फोट होऊन १५१ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. पंजाब प्रांतातील बहावलपूर जिल्ह्यात रविवारी ही भयंकर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १४० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
हा टँकर कराचीहून लाहोरला येत होता. जिल्ह्यातील अहमदपूर शारकिया भागात पहाटे तो उलटला. टायर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली. टँकरमधून गळालेले तेल गोळा करण्यासाठी आसपासच्या गावातील लोकांची दुर्घटनास्थळी एकच झुंबड उडाली. लोक तेल गोळा करण्यात गर्क असताना कोणीतही सिगारेट पेटविली. त्यामुळे भडका उडाला.
जिल्हा समन्वय अधिकारी राणा सलिम अफझल यांनी पाकिस्तानच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले. जखमींपैकी बहुतांश लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. टँकरमधून जवळपास ५० हजार लिटर पेट्रोलची गळती झाली होती, असे अफजल म्हणाले. मृतांत महिला आणि बालकांचा समावेश आहे. मृतांपैकी बहुतांश मृतदेह ओळख न पटण्याइतपत जळाले असून, केवळ डीएनए चाचणीद्वारेच त्यांची ओळख पटविता येऊ शकेल, असे मदत पथकाचे अधिकारी जम सज्जाद यांनी सांगितले.
सांडलेले पेट्रोल गोळा करण्यास आले होते लोक-
तेलाचा टँकर उलटलेल्या ठिकाणी महामार्ग पोलीस पोहोचले होते. नजीकच्या मौजे रमजान गावातील लोकही तेथे गोळा झाले. पोलिसांनी त्यांना निघून जाण्यास सांगितले; परंतु पोलिसांचे न ऐकता ते पेट्रोल गोळा करू लागले.
अचानक टँकरचा स्फोट झाला आणि आसपास असलेल्या लोकांना बचावाची थोडीही संधी मिळाली नाही. त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. बहुतांश लोक पेट्रोल गोळा करण्यासाठी दुचाकीवरून तेथे आले होते.

Web Title: Pakistan's oil tanker exploded, killing 151 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.