इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 08:14 PM2018-08-01T20:14:15+5:302018-08-02T15:12:54+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित सोहळ्याला उपस्थित राहावेत यासाठी इम्रान खान यांचे प्रयत्न
नवी दिल्ली: पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षानं सर्वाधिक जागा पटकावल्या. इम्रान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या समारंभाला भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावसकर आणि बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पीटीआय पक्षाचे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रित करण्याचा इम्रान खान यांचा विचार आहे. त्यासाठी इम्रान खान यांचे निकटवर्तीय भारतीय पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहेत. मात्र शपथविधी सोहळ्याला फक्त दहा दिवस शिल्लक राहिल्यानं पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
सार्क देशांचे प्रमुख शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहावेत, यासाठी इम्रान खान यांच्या कार्यालयाचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय सध्या इम्रान खान यांच्या पक्षाकडून इतर पक्षांसोबतदेखील संवाद साधला जात आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सध्या पीटीआयचे प्रयत्न सुरू आहेत. 25 जुलैला पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये इम्रान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र त्यांना बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. निवडणुकीचे निकाल आल्यावर इम्रान खान यांनी 11 ऑगस्टला आपण पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं जाहीर केलं होतं.