पाकने काश्मीर मुद्दा युनोत मांडणे हा हस्तक्षेप - भारत
By admin | Published: October 16, 2015 04:07 AM2015-10-16T04:07:33+5:302015-10-16T04:07:33+5:30
पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या (युनो) विविध मंचांवर जम्मू व काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने बुधवारी पाकची ही कृती संदर्भहीन
संयुक्त राष्ट्र : पाकिस्तान संयुक्त राष्ट्राच्या (युनो) विविध मंचांवर जम्मू व काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असल्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना भारताने बुधवारी पाकची ही कृती संदर्भहीन आणि आपल्या अंतर्गत कारभारात स्पष्ट ढवळाढवळ असल्याचे म्हटले. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून पुढेही राहील, असेही भारताने स्पष्टपणे बजावले.
संयुक्त राष्ट्रात पाकच्या मुत्सद्याने केलेल्या वक्तव्यांवर प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा उपयोग करताना संयुक्त राष्ट्रातील भारतीय मिशनचे सचिव अभिषेक सिंह म्हणाले की, पाकने प्रत्युत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करण्याऐवजी आत्मपरीक्षण करून तो देश कोणत्या दिशेने जात आहे, हे पाहिले पाहिजे.
संयुक्त राष्ट्रातील पाकच्या राजदूत मलीहा लोधी यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या सत्रात काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मिरी लोक काश्मीर वादाच्या केंद्रस्थानी असून हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास त्यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे. चर्चेसाठी काश्मिरींशी विचारविनिमय न करणे ही पूर्वअट मान्य होऊ शकत नाही. यातून काही निष्कर्षही निघणार नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. सिंह म्हणाले की, भारताचा निम्मा जम्मू-काश्मीर गिळंकृत करणाऱ्या देशाने अशी विधाने करणे हास्यास्पद आहे. पाकने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने भारतात अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागल्याबद्दल सिंह यांनी दु:ख व्यक्त केले.