नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानकडून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 06:17 AM2019-05-05T06:17:11+5:302019-05-05T06:17:35+5:30
पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सरकार प्रत्युत्तर देऊ इच्छित होते.
नवी दिल्ली - पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईला पाकिस्तान सरकार प्रत्युत्तर देऊ इच्छित होते. तथापि, देशातील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठीच पाकिस्तानने प्रत्युत्तराची योजना बनविली आणि या युद्धात अधिक पुढे जायचे नाही हे निश्चित केले, असे एका अहवालात म्हटले आहे. सरकार संभाव्य संघर्षातून बाहेर पडले आहे, याची जाणीव लोकांना होऊ द्यायची नव्हती, हाही या प्रत्युत्तरामागचा उद्देश
होता.
सेंटर फॉर जॉइंट वेल्फेअर स्टडीजने याबाबतची माहिती प्रकाशित केली आहे. यात म्हटले आहे की, पाकिस्तानला याची जाणीव होती की, या प्रत्युत्तरातून केवळ इच्छाशक्तीचे प्रदर्शन करायचे आहे. यात भारताचा लष्करी आणि नागरी भाग टार्गेट नव्हताच. पाकिस्तानने आपल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठीच हे सर्व
केले.
यात असेही म्हटले आहे की, विंग कमांडर अभिनंदनची सुटका करण्याची घोषणा घाईत घेण्यात आली. यातूनही हा संकेत देण्यात आला की, युद्धजन्य स्थिती पाकिस्तान वाढवू इच्छित नाही. पाकिस्तानच्या सैन्याने अभिनंंदन यांना २७ फेब्रुवारी रोजी खाली पडल्यानंतर पकडले होते. १ मार्च रोजी पाकिस्तानने त्यांची सुटका केली.