पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:21 AM2024-01-19T06:21:28+5:302024-01-19T06:21:43+5:30

सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात कथित अतिरेकी तळांवर हल्ल्यांचा दावा

Pakistan's response to Iran; 9 killed in the attack, tensions rise | पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला

पाकिस्तानचे इराणला प्रत्युत्तर; हल्ल्यात ९ ठार, तणाव वाढला

इस्लामाबाद : इराणनेपाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांविरोधात केलेल्या कारवाईनंतर पाकिस्ताननेही गुरुवारी जशास तसे प्रत्युत्तर दिले. इराणच्या सीमावर्ती सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात अतिरेक्यांच्या कथित तळांवर लष्करी हल्ले केले. त्यात नऊ जण ठार झाल्याने दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. 

पाकिस्तानने तेहरानमधून आपल्या दूताला परत बोलावल्यानंतर आणि सर्व नियोजित उच्चस्तरीय निलंबित केल्याच्या एका दिवसानंतर गुरुवारी ही कारवाई केली. गुरुवारी सकाळी पाकिस्तानने इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी अड्ड्यांवर अचूक लष्करी हल्ले केले. 

गुप्त माहितीवर आधारित या मोहिमेत अनेक दहशतवादी मारले गेल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने गुरुवारी सकाळी केला. या मोहिमेला पाकिस्तानने ‘मार्ग बार सरमचार’ असे सांकेतिक नाव दिले होते. पर्शियन भाषेत, ‘मार्ग बार’ म्हणजे ‘मृत्यू’ तर बलुच भाषेत ‘सरमचार’ म्हणजे ‘गनिम’ होय.

...अन् चीनने दिला मध्यस्थीचा प्रस्ताव
चीनने गुरुवारी पाकिस्तान आणि इराण यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर तणाव कमी करण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे. दोन्ही देशांनी संयम आणि शांतता बाळगून तणाव टाळावा, असे आवाहन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी केला.

काळजीवाहू पंतप्रधान दावोसहून माघारी
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला उपस्थित राहण्यासाठी दावोसमध्ये असलेले काळजीवाहू पंतप्रधान अन्वारुल-हक-ककर आपला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत. परराष्ट्र मंत्री जलील अब्बास जिलानी हेही युगांडा दौऱ्यावरून तातडीने माघारी येण्यासाठी रवाना झाले आहेत.

हा दोन्ही देशांतील अंतर्गत विषय : भारत
इराणचा पाकिस्तानवरील क्षेपणास्त्र हल्ला हा त्या दोन राष्ट्रांतील अंतर्गत चिंतेचा विषय आहे. भारताने नेहमीच दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली आहे. स्वसंरक्षणासाठी देशाने केलेली कृती आम्हाला समजते, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

घातक ड्रोन, शस्त्रांचे हल्ले
पाकिस्तानी सैन्याच्या प्रसिद्धी शाखेने एका निवेदनात म्हटले आहे की, घातक ड्रोन, रॉकेट, युद्धसामग्री आणि शस्त्रे वापरून अचूक हल्ले केले गेले. 
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. या दोन्ही गटांनी यापूर्वी पाकिस्तानमध्ये अनेक हल्ले केले आहेत.

दोन्ही शेजारी बंधू देश आहेत आणि त्यांनी संवाद आणि परस्पर सल्लामसलत करून समस्या सोडवल्या पाहिजेत. तथापि, पाकिस्तान आपल्या राष्ट्रीय सुरक्षेशी आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड करणार नाही.    - आरिफ अल्वी, 
    अध्यक्ष, पाकिस्तान

Web Title: Pakistan's response to Iran; 9 killed in the attack, tensions rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.