मोदींच्या विमानासाठी पाकचे निर्बंध शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 07:35 AM2019-06-12T07:35:38+5:302019-06-12T07:35:52+5:30
हवाई क्षेत्र : बिश्केक येथील शांघाय सहकार्य परिषदेत मोदी होणार सहभागी
लाहोर : किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान आपल्या हवाई हद्दीतून जाऊ देण्यास परवानगी देण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. १३ व १४ जून रोजी बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर बैठकीसाठी मोदी जाणार आहेत. मध्य आशियातील त्या शहरात जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग पाकिस्तानवरून जातो. परंतु २६ फेब्रुवारी रोजी भारताने बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केल्यापासून पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून जाणारेसर्व हवाईमार्ग बंद करून ठेवले आहेत.
मोदींच्या विमानास बिश्केक येथे जाण्यासाठी हे निर्बंध शिथिल करून परवानगी द्यावी, अशी विनंती भारताने पाकिस्ताननेन केली होती. पाकिस्तानच्या हवाई निर्बंधबाबतच्या या निर्णयास भारतही सकारात्मक प्रतिसाद देईल. व उभय देशांमधील सर्व वाद सोडविण्यासाठी चर्चा करण्याचा पंतप्रधान इम्रान खान यांचा प्रस्ताव मान्य करेल, अशी अपेक्षाही या अधिकाºयाने व्यक्त केली. ‘एससीओ’ शिखर परिषदेसाठी इम्रान खानही जाणार आहेत. परंतु तेथे त्यांची व मोदींची स्वतंत्रपणे भेट होण्याचा सध्या तरी कोणताही कार्यक्रम नाही.
औपचारिकतेनंतर भारताला कळवणार!
पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भारताची ही विनंती मान्य करण्याचे पाकिस्तानने ठरविले आहे. काही औपचारिकता पूर्ण झाल्यावर भारतास तसे अधिकृतपणे कळविले जाईल.