पाकिस्तानलाही हाफिजचा धोका!
By admin | Published: February 22, 2017 01:03 AM2017-02-22T01:03:55+5:302017-02-22T01:03:55+5:30
जमात - उद - दावाचा प्रमुख हाफिज सईद हा देशासाठी गंभीर धोका ठरु शकतो, असे मत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ
लाहोर : जमात - उद - दावाचा प्रमुख हाफिज सईद हा देशासाठी गंभीर धोका ठरु शकतो, असे मत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केले आहे. जर्मनीत म्युनिक येथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा संमेलनात त्यांनी हे मत व्यक्त केले.
हाफिज सईद हा मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड आहे. यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्याकडून देशाला असणारा संभावित धोका त्यांनी बोलून दाखविला आहे. द नेशनच्या वृत्तानुसार, रविवारी म्युनिक येथे बोलताना आसिफ म्हणाले की, सईद समाजासाठी गंभीर धोका ठरु शकतो. देशाचे हित लक्षात घेऊन सईदला अटक करण्यात आली होती.
सईदला दहशतवाद विरोधी कायद्यानुसार ३० जानेवारी रोजी लाहोरमध्ये एका घरात नजरबंद केले आहे. त्यामुळे त्याच्या समर्थकांकडून गोंधळ घालण्यात आला. सईदला एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले असून याचा अर्थ तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे दहशतवादाशी जोडलेला आहे. या सूचीत त्याचा समावेश करण्यात आल्याने त्याला देश सोडून जाता येणार नाही.
मुंबई हल्ल्यानंतरही सईदला नजरबंद करण्यात आले होते. पण, २००९ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची सुटका करण्यात आली होती. अमेरिकेने सईदवर एक कोटी डॉलरचे बक्षिस ठेवलेले आहे. (वृत्तसंस्था)
बचावात्मक धोरण
हाफिज सईदबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जे वक्तव्य केले आहे ते भारताच्या संरक्षण मंत्र्यांसारखे आहे, असे मत पाकिस्तान ‘तहरिक ए इन्साफ’चे नेते महमूदूर रशीद यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, पाकिस्तानने भारत आणि अमेरिकेशी संबंधित बचावात्मक धोरण अवलंबिले आहे.