पाकिस्तानचा काश्मीरला पाठिंबा, शरीफ पुन्हा बरळले
By admin | Published: October 10, 2016 10:06 PM2016-10-10T22:06:10+5:302016-10-10T22:19:44+5:30
काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केले आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - काश्मीरमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ यापुढेही सुरूच राहणार आहे. काश्मीरला आमचा पाठिंबा राहील, आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही, असे वक्तव्य पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज केले आहे. काश्मीरवर चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग या त्यांच्या पक्षाची बैठक बोलाविली होती. त्यावेळी ते बोलत होते.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त करत ३८ जणांचा खात्मा केला होता. भारताच्या या आक्रमक पवित्र्याला शरीफ योग्य उत्तर देऊ शकत नसल्याची टीका त्यांच्या पक्षातून होऊ लागली आहे. याच धर्तीवर पाकने ही बैठक बोलावली होती.
यावेळी बोलताना नवाज शरीफ यांनी दहशतवादी बु-हाण वाणीचं पुन्हा एकदा उदात्तीकरण करत त्याला स्वातंत्र्यसैनिक ठरवला आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बुऱ्हाण वाणी हा लष्कराच्या चकमकीत मारला गेल्यानंतर पाकिस्तानने त्याचे उदात्तीकरण सुरूच ठेवले आहे.