पाकिस्तानचे शेपूट वाकडेच
By admin | Published: August 15, 2016 06:18 AM2016-08-15T06:18:21+5:302016-08-15T06:31:16+5:30
‘भारत द्वेश’ हा एककलमी कार्यक्रम राबविणाऱ्या पाकिस्तानने शनिवारी त्यांचा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्याऐवजी भारताच्या कुरापती काढण्यातच विकृत धन्यता मानली.
नवी दिल्ली : स्वत:चा विकास आणि कल्याण करण्याऐवजी गेली ७० वर्षे ‘भारत द्वेश’ हा एककलमी कार्यक्रम राबविणाऱ्या पाकिस्तानने शनिवारी त्यांचा स्वातंत्र्य दिन आनंदात साजरा करण्याऐवजी भारताच्या कुरापती काढण्यातच विकृत धन्यता मानली.
पंजाबच्या वाघा सीमाचौकीवर पाकिस्तानच्या रेंजर्सनी भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिठाई वाटली, तर दुसरीकडे काश्मीर सीमेवर पुंच्छ भागात भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांच्या कारवाईत बुऱ्हाण वणी मारला गेल्यापासून, ३४ दिवस धुमसत ठेवलेल्या काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पाकने उघड चिथावणीही दिली. काश्मिरात जनजीवन ठप्प असल्याने, तेथे आपल्या बाजूने जीवनावश्यक वस्तूंची रसद पुरविण्याचा आगीत तेल ओतणारा प्रस्तावही पाकने केला. भारताने पाकिस्तानच्या या प्रत्येक उक्ती आणि कृतीला चोख प्रत्युत्तर देत आता पाकिस्तानच्या ताब्यात असलेले काश्मीर मुक्त करणे हा एकमेव न सुटलेला द्विपक्षीय मुद्दा शिल्लक असल्याचे ठणकावून सांगितले. सकाळी वाघा सीमा चौकीवर मिठाई वाटली जात असताना, तिकडे इस्लामाबादमध्ये झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मामून हुसैन यांनी काश्मीरचा मुद्दा मुद्दाम उपस्थित केला.
काश्मिरी जनतेच्या स्वयंनिर्णयाच्या लढ्यास पाकचे समर्थन कायम राहील व पाकिस्तान काश्मिरींना कधीच विसरणार नाही, असे त्यांनी सांगितले. इकडे नवी दिल्लीत पाकच्या उच्चायुक्तालयामध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम झाला, तेव्हा पाकचे सैनिक काश्मीर सीमेवर पुंच्छ भागात भारतीय चौक्यांवर गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा करीत
होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>काश्मीर के नाम आजादी
‘इस साल की जश्न-ई-आजादी हम काश्मीर की आजादी के नाम करते है,’ असे चिथावणीखोर विधान पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी त्यांचा राष्ट्रध्वज फडविल्यानंतर केले. काश्मिरी जनतेचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा दृढ विश्वास आहे. काश्मिरातील सध्याची अशांतता संपायला हवी. कितीही ताकदीचा उपयोग केला, तरी काश्मिरातील जनतेच्या राजकीय आकांक्षांना दडपले जाऊ शकत नाही. काश्मिरी जनतेचा जो ‘वैध संघर्ष’ आहे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा भाग मुक्त करून, तो जम्मू-काश्मीरमध्ये आणि भारतीय संघराज्यामध्ये पुन्हा कसा सामील करायचा, एवढाच आमच्या दृष्टीने पाकिस्तानसोबत अनिर्णित राहिलेला मुद्दा आहे.
-जितेंद्र सिंग, राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय
>करता तेवढी निर्यात पुरे झाली
आंतरराष्ट्रीय दहशतवाद, सीमापार घुसखोरी, शस्त्रे, अंमली पदार्थ
आणि बनावट चलनी नोटा हा पाकिस्तानकडून केली जाणारी
प्रमुख निर्यात आहे व भारतासह या क्षेत्रातील इतर देशांनी या निर्या
तीची फळे खूप भोगली आहेत. त्यामुळे पाकिस्तानने आम्हाला आणखी काही पुरविण्याचे सौजन्य दाखवू नये, अशी तिखट व तिरसट प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी व्यक्त केली.गेला महिनाभर काश्मीर खोऱ्यातील जनजीवन ठप्प असल्याने तेथील
नागरिकांच्या सोईसाठी, सीमेच्या पलीकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव करणारे एक टिपण, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयात राजनैतिक माध्यमातून १२ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आले. त्यावर विकास स्वरूप यांनी वरील प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानच्या या प्रस्तावाचे फक्त ‘नादानपणाचा’ एवढेच वर्णन करता येईल, असे ते म्हणाले.