‘पनामा’ तपास; शरीफ यांची गुरुवारी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 01:47 AM2017-06-13T01:47:14+5:302017-06-13T01:47:14+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ पनामागेट लाचखोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) गुरुवारी हजर होतील. पदावर असताना
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ पनामागेट लाचखोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संयुक्त तपास पथकासमोर (जेआयटी) गुरुवारी हजर होतील. पदावर असताना अशा प्रकारच्या पथकासमोर हजर होणारे ते पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. कझाकिस्तान दौऱ्यावरून परतल्यानंतर शरीफ यांना समन्स जारी करण्यात आले होते.
याप्रकरणी चर्चा करण्यासाठी शरीफ यांनी रविवारी लाहोर येथे आपल्या विश्वासू निकटवर्तीयांची भेट घेतली. त्यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर शरीफ यांनी समन्सचे पालन करून गुरुवारी जेआयटीसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला.
जेआयटीला ६० दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण करायचा आहे. शरीफ यांची एकदाच चौकशी
होईल की मुलांप्रमाणे त्यांनाही
पुन्हा बोलावले जाईल हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मुलांची झाली चौकशी
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या जेआयटीने शरीफ कुटुंबियांच्या कथित बेकायदा व्यावसायिक व्यवहारांबाबत शरीफ यांची मुले हुसैन आणि हसन यांची गेल्या महिन्यात चौकशी केली होती. त्यांचे ज्येष्ठ पुत्र हुसैन यांची पाच वेळा तर कनिष्ठ पुत्र हसन यांची दोन वेळा चौकशी झाली आहे. १९९० मध्ये शरीफ पंतप्रधान असतानाच्या मनी लाँड्रिंगच्या आरोपांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी विभाजित निर्णय दिला होता.