दहशत अन् रक्ताचा सडा!
By admin | Published: November 15, 2015 02:44 AM2015-11-15T02:44:49+5:302015-11-15T02:44:49+5:30
हल्लेखोरांकडे युद्धात वापरली जाणारी शस्त्रे होती. त्यात स्वयंचलित रायफलींचा समावेश होता. त्यांच्याकडे स्फोटके असलेले आत्मघातकी बेल्टही होते. त्यांनी शहरात ६ ठिकाणी बेछूट गोळीबार केला
हल्लेखोरांकडे युद्धात वापरली जाणारी शस्त्रे होती. त्यात स्वयंचलित रायफलींचा समावेश होता. त्यांच्याकडे स्फोटके असलेले आत्मघातकी बेल्टही होते. त्यांनी शहरात ६ ठिकाणी बेछूट गोळीबार केला. शुक्रवारची एक सामान्य रात्र पॅरिससाठी कर्दनकाळ ठरली आणि सर्वत्र रक्ताचा सडा पडला. या प्रकाराला केवळ ‘नरसंहार’ एवढेच संबोधता येईल.
पूर्व पॅरिसमधील बॅटाकलां कॉन्सर्ड हॉलमध्ये लोक ‘अमेरिकन रॉक बँड’ या कार्यक्रमासाठी जमले होते. त्याच क्षणी तेथे ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा देत हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार सुरू केला आणि लोकांना ठार मारले. काही जणांना ओलीस ठेवून घेतले, असे एका प्रत्यक्षदर्शीने फ्रान्समधील एका रेडिओ केंद्राला सांगितले.
या स्थळापासून एक मैल अंतरावरील दहशतवाद्यांनी बेले इक्विए बार येथे गोळीबार केला. शुक्रवारची रात्र आणि आठवडाअखेर सुरू असल्याने येथे प्रचंड गर्दी होती. तेथे असलेल्या प्रत्यक्षदर्शीने फ्रेंच रेडिओला सांगितले की, मृत आणि जखमी जमिनीवर धडाधड कोसळत होते, सर्वत्र रक्ताचे पाट वाहत होते. येथील हल्ल्यात १८ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. फ्रान्सचे प्रॉसिक्युटर फ्रॅनकॉईस मॉलिन्स म्हणाले की, फ्रान्स आणि जर्मनी यांच्यात नॅशनल स्टेडियमवर प्रदर्शनीय फूटबॉल सामना सुरू होता. तो पाहण्यासाठी ८० हजार लोक जमले होते. या सामन्यात फ्रान्सने जर्मनीचा पराभव केला. त्याचवेळी स्टेडियमच्या बाहेर प्रचंड स्फोट झाले. स्फोट ऐकू येताच फ्रान्सच्या खेळाडूंनी घाबरून चेंडू लाथाडून दिला आणि पलायन करण्यास प्रारंभ केला. ग्रेगरी गोषील या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन बॉम्बस्फोट आत्मघातकी हल्ले होते व त्यापैकी एका बॉम्बस्फोटात तीन जण ठार झाले. हे स्टेडियम प्रथमच दहशतवाद्यांचे ‘लक्ष्य’ बनले असून, दोन स्फोट प्रवेशद्वाराजवळ, तर एक जवळच असलेल्या हॉटेलमध्ये झाला. येथून खऱ्या अर्थाने दहशतवादी हल्ल्यांना वेगाने प्रारंभ झाला.
मीरा कामदार यांनी फ्रान्समधील या हल्ल्याचा अनुभव कथन केला आहे. त्या भारत-अमेरिका संबंधातील तज्ज्ञ आहेत. पॅरिसमध्ये हल्ला झाला त्या वेळी त्या तेथे होत्या. या हल्ल्याबाबत त्यांनी सांगितले की, एका टॉक शोमध्ये सहभागी होण्यासाठी मी येथे आले होते.
दहशतवाद्यांनी पहिला हल्ला केलेल्या कंबोडियन हॉटेलपासून जवळच १०० मीटर अंतरावर मी राहते. मी तेथे बऱ्याच वेळा जेवणासाठी गेले आहे. हल्ले झालेल्या ठिकाणी आमचे अनेक मित्र होते आणि ते सुदैवाने बालंबाल बचावले.
एका मित्राचा भाऊ आणि त्याची गर्भवती
पत्नी हल्ला झालेल्या ठिकाणी त्या हॉटेलात गेले होते. ते जेवण करून निघून गेल्यानंतर अर्ध्या
तासाने तेथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. आणखी एका मित्राचा भाऊ बॅटाकलां कॉन्सर्ट हॉलच्या बाजूला राहतो. याच ठिकाणी दहशतवाद्यांनी तेथे आलेल्या नागरिकांना ओलीस ठेवले होते. आणखी एका मित्राचा मुलगा हल्ला झालेल्या हॉटेलपासून अवघ्या १५० मीटरवर राहतो.
या हल्ल्यामागेही एक स्वतंत्र विचार आहे. गेल्या जानेवारीत व्यंगचित्रांशी संबंधित एका नियतकालिकाच्या कार्यालयावर हल्ला झाला होता. तोही दहशतवादी हल्ला होता. हा दहशतवादी हल्ला असून, सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यातही बहुधा तरुण बळी पडले आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच
मॉलिन्स म्हणाले की, रस्त्यावरच १४ जणांचे, तर अन्य पाच जणांचे इतरत्र मृतदेह आढळले. विविध ठिकाणी झालेल्या हल्ल्यांनी केवळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते आणि कोठे काय चालू आहे, याची काहीच माहिती कळत नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच पॅरिसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला आहे. दहशतवाद्यांनी अनेक कॅफेंच्या बाहेर गोळीबार करून नंतर आत प्रवेश केला. मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. एका कॅफेमध्ये पेरी-हेन्री लोम्बार्ड जेवण करीत होते. फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी फटाक्यांचे आवाज केले जातात, त्याप्रमाणे त्यांना प्रथम आवाज ऐकू आले; पण नंतर त्यांना खरा प्रकार लक्षात आला. त्याक्षणीच तेथील कर्मचारी ओरडतच बाहेर आले. रस्त्यावर डझनभर लोक खाली कोसळल्याचे दिसले.
वर्षभरात दुसऱ्यांदा पॅरिस हादरले
१३ नोव्हेंबरची शुक्रवारची रात्र नेहमीसारखी होती. स्थानिक आणि विदेशी पाहुणे मध्य पॅरिसच्या रस्त्यांवर मनसोक्त फिरत होते. आवडीप्रमाणे कॅफे, रेस्टॉरन्टमध्ये भोजनाचा आणि मद्याचा स्वाद घेत होते, तर हौशी मंडळी बॅटाकलां थिएटरमध्ये ‘शो’ पाहण्यात रमली होती. शुक्रवारची रात्र काळरात्र होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. चार्ली हेब्दो कार्यालयावर जानेवारीत झालेल्या हल्ल्यानंतर पॅरिस पुन्हा लयीत बागडत होते.. आणि रात्रीचे १० वाजण्याच्या सुमारास पॅरिस पुन्हा बॉम्बस्फोट, गोळीबाराने हादरले. सर्वत्र जिवाच्या आकांताने घबराट पसरली.
बॅटाकलां म्युझिक थिएटर रसिकांनी भरले होते. रात्री पावणे अकराच्या सुमारास गोळीबार करीत आणि बॉम्ब डागत दहशतवादी थिएटरमध्ये शिरले. काही कळायच्या आत मानवतेच्या या शत्रूंनी बेछूट गोळीबाराने एका-एकाला टिपणे सुरू केले. सांगीतिकगृहात रूपांतरित झालेले १९व्या शतकातील हे नाट्यगृह पापणी मिटण्याच्या आत रक्ताने माखले. थिएटर जिवाच्या आकांताने हादरले. जीव वाचविण्यासाठी धावपळ करीत अनेक जण थिएटरमधून बाहेर पडत होते. अनेकांचे शरीर रक्तबंबाळ होते, असे कॅटरिना गिआर्डीओ (इटालीयन नागरिक) यांनी सांगितले. थिएटरमध्ये कॅलिफोर्नियाचा रॉक बँड ईगल्स आॅफ डेथ मेटलचे पथक आपल्या चौथ्या अल्बमचे सादरीकरण करत होते. काहीतरी अघटित घडल्याचे लक्षात येताच प्रेक्षक जीव मुठीत धरून बाहेर सैरावैरा पळू लागले. मी मागे वळून पाहिले असता हल्लेखोरांपैकी एक विशीतील हल्लेखोर दिसला. त्याने छोटीशी दाढी राखली होती, असे युरोप-१ रेडियाचा बातमीदार ज्युलियन पिअर्स यांनी सांगितले. आत चालू असलेल्या सांगीतिकेचाच हा एक भाग असावा, असे आधी आम्हाला वाटले. परंतुु, मागे वळून निरखून पाहिले असता मला रायफलधारी हल्लेखोर दिसला. त्याच्या रायफलीतून धूरही निघत होता. काहीतरी भयंकर घडल्याचे ध्यानात आले. हल्लेखोर रायफलीत गोळ्या भरण्यात गुंतल्याचे पाहून मी पळ काढला, असे पिअर्स श्वास रोखून सांगत होता. खेळण्यातील (डॉमिनोज) ओंडक्याप्रमाणे लोक कोसळत होते, असे निरोप्याचे काम करणाऱ्या २२ वर्षांच्या टूनने सांगितले. ३ बंदूकधाऱ्यांनी थिएटरमध्ये पुन्हा बेछूट गोळीबार सुरू करताच मोठ्या हिमतीने थिएटरचा दरवाजा गाठला. एका हल्लेखोराने मोठी हॅट घातली होती. हल्लेखोर काळ्या पोषाखात होते. १९९०च्या उत्तरार्धात स्थापन करण्यात आलेल्या या रॉक बँडचे सदस्य जेस ह्युजेस आणि जोश होम सुरक्षित आहेत.
> व्यभिचाराच्या राजधानीवर
आम्हीच केले सूडाने हल्ले
कैरो : पॅरिसमध्ये १२७ निरपराधांचे बळी घेणाऱ्या साखळी अतिरेकी हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (इसिस) स्वीकारली असून यापुढेही फ्रान्स हे ‘आमच्या लक्ष्यांच्या यादीत वरच्या स्थानावर राहील’, अशी धमकीही दिली आहे.
पॅरिसवरील हल्ल्यांनी सुन्न झालेले जग सावरण्याच्या आधीच इस्लामिक स्टेटने अरबी आणि फ्रेंच भाषेत एक निवेदन आॅनलाइन प्रसिद्ध करून आपल्या राक्षसी कृतीची कबुली दिली. अतंय्त आत्मप्रौढीच्या भाषेत काढलेल्या या निवेदनात इस्लामिक स्टेट म्हणते, ‘ स्फोटकांचे पट्टे आणि स्वचलित शस्त्रांनी सज्ज अशा आमच्या आठ सदस्यांनी ‘व्यभिचार व दुर्गुणांच्या राजधानी’तील काळजीपूर्वक निवड केलेल्या आठ लक्ष्यांवर हल्ले केले. यात फ्रान्स व जर्मनी यांच्यातील फूटबॉल सामना होत असलेले स्टेडियम व ‘शेकडो धर्मभ्रष्टांच्या उपस्थितीत होत असलेल्या व्यभिचारी संगीताच्या कार्यक्रमाचा’ यांचा समावेश होता. यापुढेही फ्रान्स हे आपले प्रमुख लक्ष्य असेल, अशी धमकी देणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे.