पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:49 AM2022-06-17T08:49:36+5:302022-06-17T08:49:59+5:30

स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू बनवणाऱ्या ‘चायपानी’ या अमेरिकेतल्या एका उपाहारगृहाला शिकागो इथे झालेल्या जेम्स बियर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम उपाहारगृहाचा पुरस्कार मिळाला.

Panipuri Bhel and Chaipani Awards in the US for chai pani restaurant offering cheap and tasty Indian menu | पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार

पाणीपुरी, भेळ आणि 'चायपानी'!; स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू देणाऱ्या 'चायपानी'ला अमेरिकेत पुरस्कार

googlenewsNext

पाणीपुरी असो की पावभाजी, वडापाव असो की भेळ, खाऊगल्लीत आणि रस्त्यावर मांडलेल्या स्टॉल्समध्ये मिळणारे चाट आयटम चटपटीत तर असतातच, पण त्याचबरोबर खिशालाही परवडणारे असतात. भारतीय स्ट्रीट फूडच्या या वैशिष्ट्यांमुळे आता भारताबाहेरही हे लोण पसरले आहे. स्वस्त आणि मस्त भारतीय मेन्यू बनवणाऱ्या ‘चायपानी’ या अमेरिकेतल्या एका उपाहारगृहाला शिकागो इथे झालेल्या जेम्स बियर्ड पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम उपाहारगृहाचा पुरस्कार मिळाला. मुख्य म्हणजे या स्पर्धेत अमेरिकेतल्या अनेक नामी उपाहारगृहांनी भाग घेतला होता. 

आता तुम्ही विचाराल, चायपानी रेस्टॉरंटमध्ये असं काय आहे जे अमेरिकेतल्या भल्या भल्या रेस्टॉरंटमध्ये नाही? खरंतर अमेरिकेत जागोजागी स्ट्रीट फूड मिळतं. बहुतेक ठिकाणच्या फास्टफूड रेस्टॉरंटमध्ये ड्राईव्ह थ्रूची सोय असते. ऑर्डर द्या, पैसे भरा आणि हातात स्नॅक घेऊन पुढे निघा. पण ‘चायपानी’ने चाट आयटम्सची सवय अमेरिकनांना लावली. पिझ्झा, बर्गर खाणारे अमेरिकन्स पाणीपुरी, भेळपुरी खाऊ लागले आहेत. त्यात सध्या शाकाहार आणि त्यातही वेगाने खाणं पसंत करणारे लोक वाढत आहेत. चाट आयटम म्हणजे शाकाहार म्हटल्यावर अनेकांनी या पदार्थांकडे लक्ष वळवलं.  भारतात लोकप्रिय असलेली थाळीही इथल्या मेन्यूवर आहे. भारतीय चाट कुरकुरीत, मसालेदार, आंबट गोड, चविष्ट असते. पण जशी चाट खाऊन तोंडाला चव येते, तसंच घरचं जेवण जेवलं की मन तृप्त होतं, म्हणूनच थाळी पण तेवढीच महत्त्वाची. 

याच पुरस्कार सोहळ्यात अजून एक अतिशय प्रतिष्ठेचा, बेस्ट शेफ हा पुरस्कार चिंतन पांड्या या भारतीय शेफला मिळाला. चिंतन जिथे काम करतो, त्या धमाका नावाच्या उपाहारगृहात चाट आयटमच मिळतात हे अजून महत्त्वाचं ! रोनी मुजुमदार आणि चिंतन पांड्या यांनी ऐन कोविड साथीत धमाका सुरू केले. होम डिलिव्हरीजवर भर दिला आणि थोड्याच काळात धमाकाचा समावेश न्यूयॉर्क टाईम्सने घोषित केलेल्या न्यूयॉर्कच्या दहा सर्वोत्कृष्ट उपाहारगृहांत झाला. एकूण चाट पदार्थ आणि त्यातील नावीन्य हे आगामी काळात अमेरिकनांना वेड लावणार हे नक्की.

- भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार
bhalwankarb@gmail.com

Web Title: Panipuri Bhel and Chaipani Awards in the US for chai pani restaurant offering cheap and tasty Indian menu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.