Afghanistan: तालिबानविरुद्ध लढण्यास ‘पंजशीर’चे सिंह शस्त्रसज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 05:56 AM2021-08-22T05:56:34+5:302021-08-22T05:56:49+5:30

आतापर्यंत अजेय आहे हा प्रांत, तालिबानही घाबरतो येथील टोळ्यांना

Panjshir lions armed to fight with Taliban in Afghanistan | Afghanistan: तालिबानविरुद्ध लढण्यास ‘पंजशीर’चे सिंह शस्त्रसज्ज 

Afghanistan: तालिबानविरुद्ध लढण्यास ‘पंजशीर’चे सिंह शस्त्रसज्ज 

googlenewsNext

काबुल : अमेरिकेने सैन्य माघारीला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला. माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी भीतीने पलायन केले. एवढी दहशत असलेला तालिबान मात्र एका ठिकाणी घुसायला घाबरतो. हा भाग म्हणजे पंजशीर खोरे. अफगाणिस्तानातील ३४ राज्यांपैकी केवळ हे एकच राज्य अद्याप  तालिबानला काबीज करता आलेले नाही. यामागील कारण म्हणजे तालिबानचा कडवा प्रतिकार करणारे ताजिक समुदायाचे लोक. त्यांनी तालिबानचे प्रत्येक प्रयत्न उधळून लावले आहेत.

पंजशीर प्रांतामध्ये पंजशीर खोरे आहे. परवान प्रांताची विभागणी करून एप्रिल २००४  मध्ये हा भाग वेगळा करण्यात आला होता. पंजशीरचा अर्थ म्हणजे “पाच सिंहांचे खोरे”. काबूलपासून १५० किलोमीटर अंतरावर हा प्रांत आहे. या खोऱ्यातून पंजशीर नदी वाहते. 
अतिशय निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तालिबानने हा प्रांत ताब्यात घेण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरला आहे. अमेरिकेकडून बॉम्बचा वर्षाव होत असतानाही पंजशीर प्रांत सुरक्षित राहिला होता. 

सर्व कट्टर लढवय्ये...
तालिबानविरोधात लढण्यासाठी उत्तरी आघाडीला भारतासह ईराण, रशिया, तुर्की, ताजिकीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तानची मदत मिळत होती. या भागात ताजिक समुदायासह हजारा समुदायाचेही नागरिक मोठ्या प्रमाणावर आहेत. या समुदायाला चंगेज खानचे वंशज म्हणून ओळखले जाते. याशिवाय नूरीस्तानी आणि पशई यासारख्या समुदायाचे लोकही राहतात. हे सर्व कट्टर लढवय्ये आहेत. 
गोरिल्ला युद्धात त्यांचे प्राविण्य आहे. तसेच पर्वतरांगांचा भाग असल्यामुळे त्यांना पराभूत करणे अतिशय कठीण आहे. उत्तरी आघाडीमुळेच या समुदायांमध्ये तालिबानविरोधात लढण्याचे बळ प्राप्त झाले आहे. 

तो तान्हुला अखेर पित्याच्या ताब्यात; आईने सोपविले होते सैन्याकडे
काबुल : अफगाण नागरिकांमध्ये तालिबानच्या जुलमी राजवटीची प्रचंड दहशत आहे. त्याचे एक चित्र दोन दिवसांपूर्वी संपूर्ण जगाने पाहिले होते. एका मातेने चक्क आपल्या तान्हुल्या बाळाला अमेरिकन सैनिकांच्या स्वाधीन करून तालिबान्यांपासून त्याची सुटका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ते मूल अखेर त्याच्या वडिलांना सोपविण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते जॉन किरबी यांनी दिली आहे. 

बरादर आगामी राष्ट्राध्यक्ष? 
nसरकार स्थापनेसंदर्भात जिहादी व राजकीय नेत्यांशी चर्चा करण्याकरिता तालिबान संघटनेचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल घनी बरादर हा काबुल येथे शनिवारी पोहोचला आहे. तो या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
nयाआधी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका व अफगाणिस्तानमधील विविध नेत्यांशी बरादरने चर्चा केली होती. 

Web Title: Panjshir lions armed to fight with Taliban in Afghanistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.