पंकजा मुंडे थेट फेसबुक कार्यालयात, गरीबांच्या घरासाठी वेगा बिल्डिंगशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 08:13 PM2018-10-30T20:13:07+5:302018-10-30T20:36:06+5:30
पंकजा मुंडे यांनी बचत गटाच्या महिला प्रतिनिधांना घेऊन फेसबुकचे कार्यालय गाठले. अमेरिकेतील नामांकित उद्योगांना भेटी दिल्या.
मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी बचत गटाच्या महिलांना घेऊन थेट फेसबुक कार्यालयास भेट दिली. त्यानंतर, 2022 पर्यंत सर्वांना घरे हे मिशन पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत जगप्रसिद्ध अशा वेगा बिल्डींग सिस्टिम कंपनीच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. या कंपनीने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून परवडणाऱ्या किंमतीत घरे बांधण्याबाबत मुंडेंनी चर्चा झाली. तसेच भारतातही लवकरच हा प्रयोग सुरू केला जाईल, असे मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना घेऊन फेसबुकचे कार्यालय गाठले. अमेरिकेतील नामांकित उद्योगांना भेटी दिल्या. या दौऱ्यात पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम सिलिकॉन व्हॅलीतील फेसबुक कंपनीला भेट दिली. यावेळी, बचत गटाच्या सर्व महिला आपले अनुभव मांडायला, उत्पादने जागतिक स्तरावर दाखवायला अत्यंत उत्सुक होत्या. फेसबुक, व्हाट्सअपच्या प्रतिनिधिंशी आम्ही प्रथम राज्यामध्ये कार्यरत असलेल्या विविध योजनांबद्दल चर्चा केली आणि त्यांना महाराष्ट्रात कशापद्धतीने महिलांकडून उद्योजकता विकासाला प्रोत्साहन देण्यात येत आहे, याची माहिती दिल्याचे मुंडे यांनी सांगितले.
तसेच 2022 पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी अमेरिकेतील जगप्रसिद्ध वेगा बिल्डिंग कंपनीच्या प्रतिनिधींची भेट घेतली. आगामी दोन महिन्यात भारतात येऊन तंत्रज्ञान देवाण-घेवाणबाबत काम करण्याचे वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींनी मान्य केल्याचे मुंडे यांनी सांगितले. यावेळी वेगा बिल्डिंग सिस्टिम या कंपनीचे चेअरमन डेव्हिड कोहेन, मुख्य कार्यकारी अधिकारी केन होलेन, सचिव असीम गुप्ता आणि फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद उपस्थित होते.