पापुआ न्यू गिनी देशात भूस्खलनानं हाहाकार; ६७० माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 04:15 PM2024-05-26T16:15:20+5:302024-05-26T16:15:47+5:30
पापुआ न्यू गिनी इथं पहाटेच्या सुमारास झालेल्या भूस्खलानात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पापुआ न्यू गिनी याठिकाणी झालेल्या भूस्खलनाबाबत संयुक्त राष्ट्राचं निवेदन समोर आलं आहे. भूस्खलनामुळे ६७० हून अधिक माणसं जिवंत जमिनीखाली गाडली गेलीत. पापुआ न्यू गिनीच्या राजधानी मोरेस्बीपासून ६०० किमी अंतरावर असलेल्या काओकलाम गावात सकाळी ३ वाजता भूस्खलन झालं होतं. या भूस्खलनात मोठ्या प्रमाणात लोक ढिगाऱ्याखाली गाडली गेलीत. या घटनेत १५० हून अधिक घरे उद्ध्वस्त झालीत.
स्थानिक माहितीनुसार, रविवारी या दुर्घटनेतील ५ मृतदेह बाहेर काढण्यात आले. भूस्खलनामुळे जवळपास २० ते २५ फूट खड्डा झाला. ज्यामुळे या ढिगाऱ्यात लोकांची जिवंत राहण्याची अपेक्षा सोडून देण्यात आली आहे. ढिगारा बाहेर काढणं अत्यंत धोकादायक असू शकते. कारण अजूनही काही प्रमाणात जमीन धसत आहे. पाणी वाहत असल्याने रेस्क्यू करणाऱ्या लोकांच्या जीवालाही मोठा धोका आहे.
भूस्खलनामुळे मोठा ढिगारा तयार झाला आहे. स्थानिकांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मलबा बाजूला सारण्याचं काम सुरू केले. त्यातच राजमार्गावरील वाबाग येथून दूर गावात शनिवारी भोजन, पाणी आणि अन्य आवश्यक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या लोकांवर तंबितानिस गावात आदिवासींनी हल्ला केला. आता पापुआ न्यू गिनीचे सैनिक त्यांना सुरक्षा देत आहेत. भूस्खलनाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादा शनिवारी २ गटांमध्ये संघर्षही पाहायला मिळाला. या संघर्षात ८ जणांचा मृत्यू झाला. संघर्षात जवळपास ३० घरे जाळण्यात आली अशीही माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.