“भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला खूप फायदा”; पराग अग्रवालच्या नियुक्तीवर एलन मस्कची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:16 AM2021-11-30T11:16:24+5:302021-11-30T11:17:37+5:30
पराग अग्रवाल यांची ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
वॉशिंग्टन:सोशल मीडियावर मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची निवड करण्यात आली आहे. ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच पराग यांच्याकडे कंपनीची कमान सोपवतील, अशी माहिती देण्यात आली आहे. यातच आता स्पेस एक्स, टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या बड्या कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी या निवडीचे स्वागत केले आहे. तसेच भारतीयांच्या प्रतिभेचा, कौशल्याचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचे म्हटले आहे.
पराग अग्रवाल यांची ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अनेकांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. स्ट्रीप कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक कॉलिसन यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले असून, त्यावर एलन मस्क यांनी रिप्लाय करत पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला खूप फायदा
आताच्या घडीला गुगल, मायक्रोसॉफ्ट, एडॉब, आयबीएम, पालो ऑल्ट नेटवर्क्स आणि आता ट्विटर या कंपन्या चालवणारे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतात मोठे झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारतीयांचे अद्भूत यश वाखणण्याजोगे आहे आणि अमेरिकेने स्थलांतरितांना दिलेल्या उत्तम संधीची चांगली आठवण आहे, असे ट्विट पॅट्रिक कॉलिसन यांनी केले आहे. यावर एलन मस्क यांनी रिप्लाय करत, भारतीयांच्या प्रतिभेचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, ट्विटरने एक पत्र जारी केले आहे. यामध्ये जॅक डोर्सी म्हणाले की, कंपनीत अनेक पदांवर जबाबदारी पार पाडली आहे. पहिल्या सह-संस्थापकापासून ते सीईओची भूमिका बजावली. त्यानंतर अध्यक्षपद भूषवले. यानंतर कार्यकारी अध्यक्ष, अंतरिम सीईओ पद सांभाळले. यानंतर जवळपास 16 वर्षे सीईओ म्हणून काम केले. पण आता मी ठरवले आहे की, कंपनीला अलविदा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माझे उत्तराधिकारी म्हणजेच पराग अग्रवाल आता आमचे नवीन सीईओ असतील, असे म्हटले आहे. यावर, जॅक डोर्सी यांना मनापासून धन्यवाद आणि कृतज्ञता व्यक्त करत, जॅक डोर्सी आणि आमची संपूर्ण टीम आणि भविष्यासाठी खूप उत्साही आहोत. तुमचा विश्वास आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार, अशी प्रतिक्रिया पराग अग्रवाल यांनी दिली आहे.