मुलाच्या लॅपटॉपमध्ये पाहिलं 'असं' काही की आईला बसला मोठा धक्का; एक्सेल शीटमध्ये लिहिलेलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:17 PM2021-10-14T15:17:29+5:302021-10-14T15:18:51+5:30
Parenting Advice : एका आईने आपल्या मुलाच्या लॅपटॉपमध्ये असं काही पाहिलं की ते पाहताच तिला धक्का बसला आहे.
हल्लीची मुलं ही स्मार्टफोनसोबत लॅपटॉपचा देखील अगदी सहज वापर करतात. पण काही वेळा त्यांच्या हातात या गोष्टी देणं पालकांसाठी महागात पडू शकतं. मुलांचे फोन किंवा लॅपटॉपमध्ये कधी कधी पालकांना असं काहीतरी पाहायला मिळतं, की जे पाहून ते हैराण होतात आणि त्यांना विचार करायला भाग पाडलं जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलाच्या लॅपटॉपमध्ये असं काही पाहिलं की ते पाहताच तिला धक्का बसला आहे. या महिलेने यानंतर तज्ज्ञांकडून सल्ला मागितला आहे. मुलाच्या लॅपटॉपमध्ये असं काही पाहिल्यानंतर यावर कशी प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल असा प्रश्न विचारला आहे.
अमेरिकेतील एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या 14 वर्षांच्या मुलाचं नाव जॅक आहे. मी त्याला त्याचा स्वत:चा लॅपटॉप देत नाही. स्वत:च्या कामासाठी तो आमचा लॅपटॉप शेअर करतो. त्यामुळे तो लॅपटॉरवर काय करतो याकडे नेहमी लक्ष ठेवता येतं. तसं पाहता माझा मुलगा बुद्धीमान आहे. मात्र तो लवकर लोकांमध्ये मिसळत नाही. एकेदिवशी जेव्हा मी त्याचा फोल्डर तपासत होते तेव्हा मला एक्सेलमध्ये स्प्रेडशीट दिसली. शीट उघडल्यानंतर मला काहीतरी विचित्र गोष्ट दिसली.
"मुलाची एक्सेल शीट पाहून महिलेला मोठा धक्का"
जॅकने लॅपटॉपमध्ये आपल्या सर्व क्लासमेट्सच्या नावांची यादी तयार केली होती. या नावांच्या पुढे तारीख आणि त्यांच्याशी संबंधित काही गोष्टी लिहिल्या होत्या. जसं एका मुलाच्या पुढे लिहिलं होतं की, त्याची आई पोलिसात कार्यरत आहे. दुसऱ्या नावाच्या पुढे लिहिलं होतं की, याच्या इन्स्टा बायोवर नाव नाही. एका मुलाच्या नावाच्या पुढे तो जाड लोकांच्या जोकवर हसतो असं लिहिलं होतं. मुलाची एक्सेल शीट पाहून महिलेला मोठा धक्काच बसला. जेव्हा महिलेने मुलाला या शीटबद्दल विचारलं तर त्याने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. मित्रांनी जोडण्यासाठी मुलाची ही पद्धत योग्य की अयोग्य याबाबत महिलेने आता चिंता व्यक्त केली आहे.
"तुमच्या मुलाने लीस्टमध्ये जे काही लिहिलं आहे ते चिंताजनक"
एका तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, तुमच्या मुलाने लीस्टमध्ये जे काही लिहिलं आहे, ते नक्कीच चिंताजनक आहे. या वयातील मुलांनी मजा-मस्ती करायला हवी. अशा प्रकारे मित्रांच्या वागणुकीबद्दल डॉक्युमेंट तयार करण्याची आवश्यकता नाही. दुसरी बाब म्हणजे तुम्ही विचारल्यानंतर तो खोटं बोलला. त्याने ती शीट त्याने लिहिली असल्याचं मान्य केलं नाही. त्याला एखाद्या थेरेपिस्टकडे घेऊन जाण्याची गरज आहे. कारण 14 व्या वर्षी मुलाचं असं वागणं योग्य नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.