पैशांसाठी आईबापच विकताहेत मुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:14 AM2021-05-31T05:14:38+5:302021-05-31T05:16:27+5:30

बालविवाहासंदर्भात अनेक देशांत कायदे असले तरी त्याच्या अंमलबजावणीची मात्र वानवाच आहे. त्यामुळे मुलींची अल्पवयात लग्नं होणं, त्यांना लवकर मुलं होणं, ती कुपोषित राहाणं, मुलींवर अत्याचार होणं हे प्रकारही नित्याचेच. 

Parents are selling girls for money | पैशांसाठी आईबापच विकताहेत मुली!

पैशांसाठी आईबापच विकताहेत मुली!

Next

जगभरात अनेक देश असे आहेत, जिथे पालकांनाच मुली नकोशा असतात. ‘मुलगाच हवा’ या हव्यासापोटी हजारो, लाखो मुली गर्भातच खुडल्या जातात. मुलींचं लग्न लवकर लावून देऊन ‘आपल्या जबाबदारीतून मुक्त होणं’ हा प्रकारही जगात सर्रास आढळतो. भारतही त्याला अपवाद नाही.

बालविवाहासंदर्भात अनेक देशांत कायदे असले तरी त्याच्या अंमलबजावणीची मात्र वानवाच आहे. त्यामुळे मुलींची अल्पवयात लग्नं होणं, त्यांना लवकर मुलं होणं, ती कुपोषित राहाणं, मुलींवर अत्याचार होणं हे प्रकारही नित्याचेच. 

मेक्सिको या देशातील मुलींची परिस्थिती मात्र आणखीच बिकट आहे. मुली गर्भातच मारल्या जाण्याचा प्रकार तिथे कमी असला, तरी लग्नासाठी ‘मुली विकण्याची’ परंपरा मात्र तिथे दीर्घ काळापासून आहे. आई-वडीलच पैशांच्या मोबदल्यात आपल्या अल्पवयीन मुलींना विकतात. 

दक्षिण मेक्सिकोमधील ग्युरेरो हे राज्य त्यासाठीच कुप्रसिद्ध आहे. लग्नासाठी येथे आजवर हजारो मुलींना विकलं गेलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालकांचाच त्यात पुढाकार असतो. त्यामुळे मुलींचं बालपण हरवणं आणि काेवळ्या वयातच आई होण्याचं प्रमाण तिथे प्रचंड आहे. 

ग्युरेरो या राज्याची लोकसंख्या सुमारे ३४ लाख आहे आणि लग्नासाठी तिथे मुली विकण्याची परंपरा असली, तरी त्यात कोणालाही वावगं वाटत नसलं, तरी स्वत: मुलींनीच आता त्याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली आहे. ‘विकण्यासाठी आम्ही काय जनावर किंवा वस्तू आहोत का’, असा खुला सवाल त्यांनी आता विचारायला सुरुवात केली आहे आणि त्याविरुद्ध आंदोलनही पुकारलं आहे. ‘आमचं बालपण आणि तारुण्य हिरावून तुम्हाला आम्हाला विकता येणार नाही’ असं म्हणत आई-बापांविरुद्ध बंड पुकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मुली विकण्याच्या प्रमाणात थोडी घट झाली असली तरी ते बंद मात्र झालेलं नाही. कारण या प्रथेला समाजमान्यता आहे. 

कुटुंबात मुलगी जन्माला आली की आनंद व्यक्त केला जातो, याचं कारण त्यांना विकून मिळणारा पैसा हे आहे. साधारणपणे दीड लाख ते १३ लाख रुपयांपर्यंत या अल्पवयीन मुलींना विकलं जातं. अतिशय लहान वयातच लग्न झाल्यामुळे अल्पवयीन मातांचं प्रमाणही येथे धक्कादायक आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार ग्युरेरो येथे गेल्या वर्षी नऊ ते सतरा  वर्षे वयोगटातील मुलींनी तब्बल तीन हजारपेक्षा जास्त मुलांना जन्म दिला.  

सेंटर ऑफ ह्यूमन राइट्स ऑफ द माउंटेनचे संचालक एबेल बेरेरा यासंदर्भात म्हणतात, इथे मुली अत्यंत असुरक्षित आहेत. अल्पवयातच लग्न झाल्यानंतर त्यांचा नवा परिवार त्यांना घरगुती आणि शेतीच्या कामासाठी अक्षरश: गुलामासारखं राबवितो. बऱ्याचदा सासरी इतर सदस्यांकडून त्यांचं लैंगिक शोषणही केलं जातं. इथे मुली म्हणजे फक्त उपभोगाच्या वस्तू झाल्या आहेत. 

६१ वर्षांच्या मॉरिलिओ ज्युलिओ सांगतात, ‘‘मलाही अतिशय लहान वयातच माझ्या पालकांनी विकून टाकलं होतं. बऱ्याचदा ‘तुमची मुलगी आम्हाला विका’ यासाठी ‘खरेदीदारां’कडून त्या कुटुंबाकडे लकडाही लावला जातो. त्यांना त्रस्त केलं जातं; पण स्वत:हूनच आपल्या मुलींना विकण्याचं प्रमाण मात्र येथे खूप मोठं आहे. अनेक महिला सांगतात, मी माझ्या मुलीला साडेपाच ते सहा हजार डॉलरमध्ये विकते आहे. कारण मला पैसे हवे आहेत. त्याशिवाय आम्ही जगणार कसं? हे सर्व ऐकून, पाहून मला अतिशय दु:ख होतं,  आपल्याच मुलींना पालक विकू तरी कसे शकतात?’’

या परंपरेला विरोध करणारी २३ वर्षीय एलोइना फेलिसियानो म्हणते, ‘‘माझ्या आई-वडिलांनीही मला १४ वर्षांची असतानाच विकून टाकलं. मी खूप विरोध केला; पण काहीच फायदा झाला नाही. हात जोडून मी आर्जवं, विनंत्या केल्या; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. विकलं तर जनावरांना जातं, पण आम्ही तर माणूस आहोत. आई-बापांकडूनच मुलीला विकलं जाणं यापेक्षा मोठं दु:ख नाही!’’

 याविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्तेही सांगतात, ग्युरेरोमध्ये आजही अनेक समुदाय असे आहेत, जिथे पैशांसाठी मुलींचा सौदा केला जातो.  
या अन्यायकारक प्रथेविरुद्ध आता मेक्सिकोमध्ये, ग्युरेरोमध्ये मुलींकडूनच आवाज उठविला जातोय. या आवाजाची धार हळूहळू तीव्र होतेय. 

बाप म्हणतात, अक्कल शिकवू नका! 
या प्रथेविरुद्ध पोटतिडकीने बाेलणारा, व्हिक्टर मोरेनो हा २९ वर्षीय तरुण कार्यकर्ता म्हणतो, ही प्रथा आमच्या देशासाठी लाजिरवाणी आहे. ठरवलं तर आम्ही ही प्रथा मोडू शकतो; पण पहिला आणि सर्वांत तीव्र विरोध मुलीच्या वडिलांकडूनच सुरू होतो. अनेक बाप स्पष्टपणेच सांगतात, मला जे करायचं, तेच मी करीन. कारण मुलगी माझी आहे. माझ्या मुलीचं मी काय करायचं याची अक्कल दुसऱ्या कोणी मला शिकवायची गरज नाही.

Web Title: Parents are selling girls for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.