पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
By admin | Published: November 19, 2015 03:47 AM2015-11-19T03:47:33+5:302015-11-19T12:25:06+5:30
पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जिअमचा अब्देहमीद अब्बाउद मारला गेल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दोन अधिका-यांच्या हवाल्याने दिले आहे.
सेंट डेनिस : पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड बेल्जिअमचा अब्देहमीद अब्बाउद माराला गेल्याचे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दोन अधिका-यांच्या हवाल्याने दिले आहे. फ्रान्सच्या सेंट डेनिस उपनगरात एका अपार्टमेंटमध्ये बुधवारी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दोन ठार झाले, तर सात जणांना अटक केली आहे. दरम्यान, स्फोटकांचे जॅकेट परिधान केलेल्या एका महिलेने स्वत:ला उडवून दिले. पॅरिस हल्ल्याचा सूत्रधार बेल्जिअमचा अब्देलहमीद अब्बाउद येथेच लपलेला होता व कारवाईदरम्यान तो ठार झाला, असे सांगण्यात येत आहे.
पॅरिसच्या उपनगरात पोलिसांनी एका अपार्टमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताच एका महिलेने स्वत:ला उडवून दिले. पोलिसांची ही कारवाई तब्बल सहा तास चालली. एका मोठ्या स्फोटानंतर ही कारवाई संपली. अर्थात या अपार्टमेंटमध्ये आणखी एक जण लपलेला असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस जेव्हा या अपार्टमेंटमध्ये घुसले तेव्हा त्यांना जोरदार हल्ल्याचा सामना करावा लागला. या कारवाईत चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याच अपार्टमेंटमधून तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांची ओळख अद्याप पटली नाही. अन्य एक पुरुष आणि एका महिलेला याच भागातून अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रपतींनी घेतली बैठक
फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांनी छापेमारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनात वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. दरम्यान, सेंट डेनिसच्या रहिवाशांनी सांगितले की, सकाळी साडेसातच्या सुमारास हा परिसर स्फोटांनी हादरून गेला. या भागातील पत्रकार बापतिस्ते मारी यांनी सांगितले की, दुसऱ्या स्फोटानंतर आणखी दोन स्फोट झाले.