पॅरिस हादरले!

By admin | Published: November 15, 2015 02:54 AM2015-11-15T02:54:55+5:302015-11-15T02:54:55+5:30

पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात १२८ जण ठार, तर १८० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८० जणांची प्रकृती गंभीर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल त्याचप्रमाणे फूटबॉलच्या सामन्यावेळेस झालेल्या

Paris shook! | पॅरिस हादरले!

पॅरिस हादरले!

Next

पॅरिसमध्ये झालेल्या हल्ल्यात १२८ जण ठार, तर १८० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ८० जणांची प्रकृती गंभीर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल त्याचप्रमाणे फूटबॉलच्या सामन्यावेळेस झालेल्या या हल्ल्यामुळे पॅरिससह सर्व जग हादरून गेले. जगभरातील नेत्यांनी या घटनेचा निषेध केला. आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, अमेरिका, भारत, युरोपातील अनेक देशांनी या वेळेस आम्ही फ्रान्सच्या पाठीमागे उभे असून दहशतवादाविरोधात लढण्याचा निश्चय अधिक बळकट केला. युरोपातील अनेक देशांमध्ये फ्रेंच वकिलातींसमोर मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक नेत्यांनी फ्रेंच राजदूतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
दहशतवाद्यांचे हल्ले थोपवणे हे मोठे आव्हान
पॅरिस येथे झालेल्या दहशतवाद्यांचा हल्ला हा फ्रान्सच्या इतिहासातील सर्वांत मोठा हल्ला आहे. दहशतवाद्यांनी जवळपास
७ ठिकाणी बॉम्बस्फोट केले. तसेच मशिनगन आणि एके-४७ने गोळीबार करून सामान्य नागरिकांना ओलीस ठेवले. २६/११ला याच प्रकारे मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेवरून भारतीय सुरक्षा एजन्सींनी बोध घ्यायला हवा. भविष्यात दहशतवाद्यांचे हल्ले थोपवणे हे मोठे आव्हान असणार आहे. दहशतवादी हल्ला होण्याआधी काय करायला हवे, हल्ला झाल्यानंतर परिस्थिती कशी हाताळावी तसेच काय उपाययोजना करायला हव्यात, याविषयी चिंतन व्हायला हवे. गुप्तचर यंत्रणा माहिती मिळवण्यात अपयशी ठरल्याने हा हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या संघटनेत माणसे पेरून जास्तीतजास्त माहिती मिळवायला हवी. याबरोबच तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती मिळवणे आवश्यक असते. अमेरिकेकडे हे तंत्रज्ञान अद्ययावत आहे. दहशतवाद्यांना शोधणे कठीण आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षा यंत्रणांचे कान आणि डोळे होणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील हल्ले निश्चित रोखले जातील. फ्रान्सने हा हल्ला योग्यरीत्या हाताळला. घटनास्थळ परिसरात संचारबंदी लागू केली. ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका केली. तसेच तेथील माध्यमांनी घटनेचे योग्यरीत्या वार्तांकन केले. सर्वांनी एकत्र येत कार्य केले, हे कौतुकास्पद आहे. आपल्याकडे हल्ले झाल्यास लगेच आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. यामुळे फ्रान्सचा आपल्या यंत्रणांनी बोध घ्यावा. भविष्यात युरोपप्रमाणेच भारतावरही हल्ले होण्याची शक्यता आहे. यामुळे हल्ले होण्याआधीच सुरक्षा यंत्रणांनी सर्वसमावेशक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- हेमंत महाजन,
ब्रिगेडीअर (निवृत्त)
इसिस सर्वांना त्रासदायक
फ्रान्सवर झालेला दहशतवादी हल्ला हा निंदनीय आहे. खऱ्या अर्थाने दहशतवाद जागतिक समस्या बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनच्या संसदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता. दहशतवादामागे काही राष्ट्रांचा हात आहे. याबरोबरच काही अराष्ट्रीय संघटना आहेत. या दोन्ही बाबी भविष्यात जगाला त्रासदायक ठरणार आहेत. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्यामागचे तथ्य शोधणे गरजेचे आहे. दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे गरजेचे आहे. इसिस या दहशतवादी संघटनेचा संपूर्ण जगालाच धोका आहे. सिरीयात अमेरिकेने इसिसच्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. फ्रान्स या लढ्याविरोधात अमेरिकेला मदत करीत आहे. यामुळे फ्रान्सला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आहे. इसिस ही धर्मवेड्या लोकांची संघटना आहे. ही संघटना सर्वांनाच त्रासदायक ठरणार असल्याने वेळीच यावर पायबंद घालणे गरजेचे आहे. दहशतवादावार पुन्हा एकदा विचारमंथन होणे गरजेचे आहे. सर्व देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून यावर तोडगा काढायला हवा.
- शशिकांत पित्रे,
मेजर जनरल (निवृत्त)
दहशतवादाविरोधात
एकत्र येण्याची गरज!
पॅरिस येथे झालेला हल्ला आतापर्यंतचा युरोपातील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी दहशतवाद्यांनी ब्रिटेनला आणि स्पेनला लक्ष्य केले आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता. दहशतवाद्यांनी जवळपास तीन महिने आधीपासून याची तयारी केली असावी. यात स्थानिक लोकांचाही हात असण्याची शक्यता आहे. कारण स्थानिकांच्या मदतीशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ला करता येणे शक्यच नाही. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सिरीया आणि इराकबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच इसिसने हल्ला केला आहे. यामुळे या घटनेत तालिबान तसेच लष्कर-ए-तय्यबा या दहशवादी संघटनांचाही हात असण्याची शक्यता आहे. याचा शोध घेणे गरजेचे आहे. इसिसमध्ये युरोपातील अनेक तरुण मुले तसेच मुली कार्यरत आहेत. त्यापैकीच या हल्ल्याचे सूत्रधार असण्याची शक्यता आहे. मुंबईवर झालेल्या दहशवादी हल्ल्यांशी याचे साम्य आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करीत अनेक नागरिकांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले होते. यामुळे मुंबईवरील हल्ल्यामागे असणाऱ्या संघटनांकडून दहशतवाद्यांनी ट्रेनिंग घेतले असण्याची शक्यता आहे. भारताच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. यासाठी आतापासूनच सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. भविष्यात या हल्ल्यांत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकाही लक्ष्य होऊ शकते; कारण अमेरिकेने इसिसविरोधात जे हवाई हल्ले केले त्याला प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी इसिसने दिली आहे. अमेरिकेला मदत करणाऱ्या राष्ट्रांनाही लक्ष्य करण्यात येईल, असेही इसिसने स्पष्ट केले आहे. येणारा काळ कठीण आहे. या दहशतदवादी संघटनांच्या हाती रासायनिक हत्यारे लागली तर संपूर्ण जगासाठी ही बाब घातक ठरणार आहे. यासाठी दहशतवाद लढ्याविरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
- दत्तात्रय शेकटकर,
लेफ्टनंट जनरल (निवृत्त)
मानवी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम व्हावी!
पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची व्याप्ती व स्वरूप स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी लागेल. मुंबईवरील २६/११चा हल्ला व वॉशिंग्टन येथील ९/११च्या हल्ल्याप्रमाणे हा आत्मघातकी हल्ला आहे. दहशतवादी संघटना, त्यांच्या विध्वंसक कृत्यांच्या बीमोडासाठी जगभरातील देश जागरूक होत असताना या भ्याड हल्ल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र यांसारख्या अतिरेकी, दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपला देश, विशेषत: महाराष्ट्र पोलीस दल सक्षम असल्याचे माझे मत आहे.
महाराष्ट्रात एटीएसबरोबरच अन्य यंत्रणा यासंबंधी प्रगल्भतेने कार्यरत आहेत. मात्र त्यासाठी आपण अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच मानवी गुप्तचर यंत्रणा (इंटेलिजिएन्स) अधिक सक्षम करण्याची गरज आहे. मुंबईवरील २६/११च्या घटनेच्या वेळी आपण इतके तयार नव्हतो. मात्र गेल्या सात वर्षांमध्ये सरकारने सुरक्षादृष्टीने आमूलाग्र सुधारणा घडवून आणल्या आहेत. विविध साधनसामग्री व उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत. घातपाती कृत्याबाबत वेळीच छडा लावण्याची जबाबदारी असलेली गुप्तचर (इंटेलिजिएन्स) यंत्रणा सक्षम करण्यात आलेली आहे.
पूर्वी येथील स्टाफ हा पोलीस दलातून प्रतिनियुक्तीवर नेमला जात असे. ठरावीक कालावधीनंतर त्यांच्या पुन्हा मूळ घटकामध्ये बदल्या होत असत. आता मात्र ही पदे थेट भरली जात असल्याने अधिकारी व कर्मचारी वर्गाला पूर्णवेळ हेच काम करावे लागते. त्यामुळे ती स्वयंपूर्ण बनलेली आहेत. तरीही त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करताना मानवी गुप्तचर पद्धतीलाही तितकेच महत्त्व देण्याची गरज आहे. कारण माणसांमध्ये वावरणे आणि त्यांच्या भावना समजून घेण्याची क्षमता कोणत्याही यंत्रणांमध्ये नसून ते काम मानवाकडूनच करता येणार आहे.
गेल्या काही वर्षांत पाश्चात्त्य देशांमध्ये ‘इसिस’चा जोर वाढला असला तरी भारतामध्ये त्यांना फारसे पाय रोवता येणे कदापि शक्य नाही. कारण परदेशात विशिष्ट विघातक विचारसरणीचे तरुण अगदी जमावाने त्यामध्ये सामील होत आहेत. त्यामागे तेथील भौगोलिक, राजकीय व सामाजिक कारणे आहेत.
भारतात मात्र तशी परिस्थिती नाही. आपल्या नागरिकांमध्ये भारतीय घटना व धर्मनिरपेक्षता भिनलेली असल्याने ‘इसिस’ला या ठिकाणी फारसा प्रतिसाद मिळणार नाही. मात्र अन्य अतिरेकी संघटनांच्या कृत्यात येथील काही जण गुंतू शकतात. त्यावर प्रतिबंध म्हणजे सामाजिक न्याय व सौहार्दाचे वातावरण टिकविणे आणि पोलिसांप्रमाणेच प्रत्येक नागरिकाने आपले डोळे व कान उघडे ठेवून सभोवतालच्या परिस्थितीबाबत जागरूक राहत पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
(लेखक हे महाराष्ट्र पोलीस
दलाचे निवृत्त महासंचालक
व महाराष्ट्र एटीएसचे माजी प्रमुख आहेत.)
> पॅरिसमधील काळरात्र

 
   स्फोटांचे आवाज : ‘स्टेड दी फ्रान्स’ (फूटबॉल स्टेडियम) येथे जर्मनी व फ्रान्समध्ये सुरू असलेला फूटबॉल सामना पाहत असताना स्टेडियमबाहेर दोन स्फोट झाले. हा सामना पाहण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रॅन्कॉई ओलांद यांच्यासह ८० हजार प्रेक्षक उपस्थित होते. रेस्टॉरंटमध्ये गोळीबार : एक तासानंतर स्टेडियमपासून पाच मैल अंतरावरील ‘रेस्ता पेटाईट कम्बोज’ रेस्टॉरंटमध्ये गोळीबार झाल्याचे वृत्त आले.१८ जणांचा मृत्यू : फ्रान्सच्या पोलिसांनी दहशतवादी हल्ल्यात १८ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी ‘बॅटाकलां थिएटर’जवळ गोळीबार झाला.10.08ढटमृतांच्या संख्येत वाढ : मृतांची संख्या २६ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ‘बॅटाकलां थिएटर’जवळील गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला; तसेच दहशतवाद्यांनी थिएटरमध्ये किमान १०० जणांना ओलीस ठेवल्याचे पोलीस म्हणाले. 10.15 ढटओलांद सुरक्षितपणे रवाना :
स्टेडियमवरून ओलांद यांना सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
 आत्मघातकी हल्ले : दहशतवाद्यांनी दोन आत्मघातकी हल्ले केल्याचे व ‘स्टेड दी फ्रान्स’ स्टेडियमबाहेर बॉम्बस्फोट केल्याचे पोलिसांनी सांगितले. स्टेडियमबाहेरील हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले. त्यानंतर ‘बॅटाकलां थिएटर’जवळ गोळीबार व स्फोट झाल्याचे वृत्त आले.
अतिरेक्यांना कंठस्नान :
पॅरिसच्या मध्यवर्ती भागात सैन्यदलाला पाचारण. पोलिसांकडून ‘बॅटाकलां थिएटर’ला घेराव. सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले.11.30ढटथिएटर हत्याकांड : ‘बॅटाकलां थिएटर’च्या इमारतीत अतिरेक्यांनी रक्तपात घडविला. अतिरेक्यांनी ओलिसांवर स्फोटके फेकली. त्यात ८० लोक मारले गेले.
थिएटरचा वेढा काढला : ‘बॅटाकलां थिएटर’जवळ जवानांनी दोन अतिरेक्यांना मारले आणि थिएटरला घातलेला वेढा काढला.आत्मघातकी स्फोट : अतिरेक्यांनी आत्मघातकी स्फोटकांचे पट्टे घातल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलिसांनी थिएटरला वेढा घालताच स्फोटकांनी स्वत:ला उडविलेअतिरेक्यांचा खात्मा : दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दहशतवाद्यांविरोधात लढा :
ओलांद यांनी ‘बॅटाकलां थिएटर’ला भेट दिली, त्यानंतर बोलताना त्यांनी, दहशतवाद्यांविरोधातील लढा आणखी तीव्र करू. मानवतेविरोधातील हल्ल्याचा प्रयत्न आम्ही निर्दयीपणे चिरडून टाकू..
ओबामांचा शोकसंदेश :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी फ्रान्सवरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. फ्रान्सच्या दु:खात अमेरिका सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.
कोब्रा मिटिंग : ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी तातडीने ‘कोब्रा कमिटी’ची बैठक बोलावली.

Web Title: Paris shook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.