पॅरिस दहशतवादी हल्ला, एका दहशतवाद्याची ओळख पटली
By admin | Published: November 15, 2015 02:01 PM2015-11-15T14:01:43+5:302015-11-15T14:24:04+5:30
फ्रान्समधील पॅरिस येथे दहशतवादी हल्ला करणा-या सातपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. उमक इस्माइल मुस्तेफई ( वय २९) असे या दहशतवाद्याचे नाव आहे.
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. १५ - फ्रान्समधील पॅरिस येथे दहशतवादी हल्ला करणा-या सातपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. उमक इस्माइल मुस्तेफई ( वय २९) असे या दहशतवाद्याचे नाव असून बॅटाकलां थिएटर येथील कापलेल्या बोटामुळे त्याची ओळख पटली आहे. बेल्जियम पोलिसांनीही अनेक संशयीतांना ताब्यात घेतली असून जर्मनीतीही एका संशयिताची चौकशी सुरु आहे.
पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री इसिसच्या दहशतवाद्यांनी सहा ठिकाणी दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे १२९ जणांचा मृत्यू झाला असून ३५२ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त होत असून विविध देशांमध्ये या हल्ल्याची पाळेमुळे रुजली असावी अशी शक्यता आहे. हल्ला करणा-या सात पैकी सहा दहशतवाद्यांनी स्वतःला उडवून घेतले होते. तर एका दहशतवाद्याला पोलिसांनी कंठस्नान घातले होते. इसिसने या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
फ्रान्सच्या तपास यंत्रणेने सात पैकी एका दहशतवाद्याची ओळख पटवली आहे. उमर मुस्तेफई असे या दहशतावाद्याचे नाव असून त्याने बॅटाकला थिएटरमध्ये हल्ला केला होता. मुस्तफेई हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून किरकोळ गुन्ह्यांमध्ये तो दोषी ठरला होता. मात्र याप्रकरणात त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली नव्हती. मुस्तफेई हा किरकोळ गुन्ह्यांमध्ये होता, पण तो दहशतवादी बनेल असे कधीच वाटले नव्हती अशी प्रतिक्रिया मुस्तफेईच्या भावाने दिली. पोलिसांनी चौकशीसाठी मुस्तफेईचा भाऊ व वडिलांना ताब्यात घेतले आहे.