संसद की बॉक्सिंगची रिंग, खासदारांनी एकमेकांवर लगावले ठोसे, तुर्कीएच्या संसदेत रणकंदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 02:17 PM2024-08-17T14:17:59+5:302024-08-17T14:18:21+5:30
Turkish parliament News : संसद, विधिमंडळ यांसारख्या सभागृहात गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. अधिवेशनाचं बरंचसं कामगाज या गदारोळामुळे वाया जातं. मात्र शुक्रवारी तुर्कीएच्या संसदेमध्ये जे काही घडलं ते पाहून सारेच अवाक् झाले.
संसद, विधिमंडळ यांसारख्या सभागृहात गोंधळ होणं हे काही आपल्यासाठी नवीन नाही. अधिवेशनाचं बरंचसं कामगाज या गदारोळामुळे वाया जातं. मात्र शुक्रवारी तुर्कीएच्या संसदेमध्ये जे काही घडलं ते पाहून सारेच अवाक् झाले. तुर्कीएच्या संसदेमध्ये शुक्रवारी सभासदांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी एकमेकांना तुफान धक्काबुक्की केली. यादरम्यान, काही खासदारांनी मध्ये पडून बचाव करण्याचाही प्रयत्न केला. या मारहाणीदरम्यान, काही महिला खासदारांनाही दुखापत झाली. काही ठिकाणी संसदेच्या फरशांवर रक्ताचा सडा पडल्याचंही दिसून आलं.
हा संपूर्ण वाद विरोधी पक्षांच्या उपनेत्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर सुरू झाला. या नेत्याने सरकारविरोधी आंदोलनाचा कट रचल्याच्याआरोपाखाली तुरुंगवास भोगलेल्या आणि नंतर खासदार म्हणून निवडून आलेल्या सहकाऱ्याला संसदेत प्रवेश मिळावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, तुर्कीएच्या संसदेत झालेल्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये सत्ताधारी एकेपीचे खासदार पोडियमवर उभ्या असलेल्या अहमत सिक यांना बुक्का मारण्यासाठी जाताना दिसत आहेत. त्यानंतर इतरही अनेक खासदारांनी या मारहाणीमध्ये उडी घेतल्याचं दिसत आहे. तर काही खासदार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. सुमारे अर्धा तास चाललेल्या या या गोंधळात किमान दोन खासदारा गंभीररीत्या जखमी झाले. त्यामुळे संसदेचं कामकाज थांबवावं लागलं.
सत्ताधारी एकेपीचे सदस्य अल्पे ओजालान यांनी टीआयपीचे खासदार अहमत सिक यांच्यावर हल्ला केला. सिक यांनी केन अताले यांना सरकारकडून देण्यात येत असलेल्या वागणुकीचा निषेध केला होता. ते म्हणाले होते की, तुम्ही अताले यांना दहशतवादी म्हणता, ही काही आश्चर्याची बाब नाही आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की, या देशातील सर्वात मोठे दहशतवादी त्या बाकांवर बसलेले आहेत. दरम्यान, ओजालान हे मंचावर आले आणि त्यांनी सिक यांना धक्का देऊन खाली पाडले, अशी माहिती संसदेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने दिली.