जर्मनीमध्ये चेहरा झाकणाऱ्या बुरख्यास अंशत: बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2017 04:20 PM2017-04-29T16:20:16+5:302017-04-29T16:21:20+5:30
सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर असताना, संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालू नये असा प्रस्ताव होता, ज्यास संसदेने मंजुरी दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
बर्लिन, दि. 29 - जर्मनीच्या संसदेने सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर असताना बुरखा घालण्यास अंशत: बंदी केली आहे. जर्मनीच्या सरकारने या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता. सरकारी कर्मचाऱ्यांनी कामावर असताना, संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालू नये असा प्रस्ताव होता, ज्यास संसदेने मंजुरी दिली आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या कन्झर्वेटिव्ह ब्लॉक या पक्षाच्या सुरक्षा विषयक अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी हा प्रस्ताव सादर केला होता. शाळा, न्यायालये आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या ठिकाणी चेहरा झाकणारा बुरखा असेल तर या कर्मचाऱ्यांच्या ओळखीचा प्रश्न निर्माण होतो, असा प्रश्न
उपस्थित करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे अशा कर्मचाऱ्यांच्या निष्पक्षतेपणावरही प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याचे म्हटले होते. हा कायदा सैनिकांनाही लागू करण्यात आला आहे. अर्थात, संसदेच्या खालच्या सभागृहात मंजूर झालेल्या या कायद्याला वरच्या सभागृहातही मंजुरी मिळवावी लागणार आहे. सीरिया व इराकमधल्या परिस्थितीमुळे जर्मनीमध्ये जवळपास 10 लाख मुस्लीम स्थलांतरीतांनी गेल्या दोन वर्षांत आसरा घेतला आहे.
हे स्थलांतरीत जर्मन नागरिकांमध्ये कसे मिसळले जातील यासंदर्भात काळजी व्यक्त करण्यात येत आहे. या समाजाचं जर्मनीमध्ये एकत्रीकरण याचा अर्थ जर्मनीची मूल्ये काय आहेत, हे स्पष्ट शब्दांत सांगणं आणि आमच्या अन्य संस्कृतींच्या प्रती असलेल्या सहिष्णूतेच्या मर्यादा स्पष्ट करणं महत्त्वाचं असल्याचे जर्मनीचे गृहमंत्री थॉमस डी मेझिरी यांनी म्हटले आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये बव्हेरिया या देशानेही शाळा, विद्यापीठे, सरकारी कार्यालये आणि मतदान केंद्रांवर चेहरा झाकणाऱ्या बुरख्याला बंदी घालणार असल्याचे म्हटले होते.
जर्मनीत स्थलांतरीत मुस्लीम स्वीकारताहेत ख्रिश्चन धर्म
बर्लिन येथल्या चर्चमध्ये काही मुस्लीम स्थलांतरीतांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे. जीझस ख्राईस्टला तुम्ही तुमचा देव व तारणहार मानता का आणि त्याचा उपदेश तुम्ही दैनंदिन जीवनात आचरणात आणाल का असा प्रश्न विचारत तसं असेल तर हो म्हणा असं धर्मगुरूने म्हटले. त्यावर त्या सगळ्यांनी हो म्हणत स्वीकार दर्शवला. उपस्थित अनेक ख्रिश्चन लोकांनी त्यांचे टाळ्या वाजवत स्वागत केले. मूळचा इराणचा असलेल्या मतीनने मी आता अत्यंत आनंदात असून, वर्णन करण्यास शब्द पुरे पडत नसल्याची भावना व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये जवळपास 10 लाख मुस्लीम स्थलांतरीतांनी जर्मनीमध्ये आसरा घेतला असून अनेकजण ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेत आहेत. अनेक समूहांनी ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेण्याची तयारी दर्शवली असून अशा विनंती वाढत असल्याचे एका धर्मगुरूने सांगितले. इराण, अफगाणिस्तान, सीरिया आणि एरिटेरया या देशांमधले हे स्थलांतरीत मुख्यत्वेकरून आहेत. सध्या माझ्याकडे असे 20 जण आले आहेत, अर्थात त्यातले किती जण ख्रिश्चन धर्म स्वीकारतील हे माहीत नाही असेही एका धर्मगुरूने म्हटले आहे.
आणखी वाचा...